गुन्हेगारांना पकडणं हे तसं पोलिसांचं नित्याचंच काम. कधी ते करताना पोलिसांना कित्येक दिवसांची मेहनत आणि प्रचंड वेळ खर्ची घालावा लागतो. तरीही गुन्हेगार हाती लागेलच, याची कोणतीही खात्री नसते. तर दुसरीकडे काही गुन्हेगार रागाच्या किंवा भावनेच्या भरात जाऊन अगदी क्षुल्लक अशी चूक करतात आणि अगदी अलगद येऊन पोलिसांच्या हातात सापडतात. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये तशीच एक घटना घडली असून शहरातील कुप्रसिद्ध अशा रावण टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आपल्या विरोधी गँगला डिवचण्याचा प्रयत्न करणारी ही टोळी अगदी अलगद पोलिसांच्या हातात येऊन सापडली.
वाढदिवस साजरा करायला आले आणि सापडले!
रावण टोळीचा मयत म्होरक्या अनिकेत जाधवचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या टोळीला गुंडा स्क्वॉड पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून १ पिस्तुल, २ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. विरोधी टोळीला डिवचण्यासाठी त्यांनी मयत अनिरुद्ध जाधवचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं होतं, असं पोलीस तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी मयत अनिकेत जाधवचा भाऊ अनिरुद्धसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
अनिरुद्ध उर्फ विकी उर्फ बाळा राजू जाधव, धीरज दीपक जैयस्वाल, रोहन राजेंद्र कांबळे, अमित भगीरथ मल्लाव, मंगेश देविदास नाटेकर आणि अक्षय लहू चौगुले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
रावेत येथील घरावर पोलिसांचा छापा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात धुमाकूळ घालणाऱ्या रावण टोळीचा प्रमुख मोरक्या मयत अनिकेत जाधव याचा वाढदिवस साजरा करून विरोधक टोळीला डिवचण्याचा डाव गुंडा विरोधी पथकाने उधळून लावला आहे. या प्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली असून मयत अनिकेतचा भाऊ अनिरुद्ध उर्फ विकी उर्फ बाळा राजू जाधव याच्याकडून १ पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही टोळी जमणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मयत अनिकेत जाधव याच्या रावेत येथील घराला वेढा टाकून छापा मारत एकूण सहा गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.