बाळासाहेब जवळकर balasaheb.javalkar@expressindia.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी मनावर घेतले तर काहीही साध्य होऊ शकते. धांगडिधगा करत रस्त्यावर साजरे होणारे वाढदिवस जवळपास बंद झाले, हे त्याचे ताजे उदाहरण. वाहतुकीतील बेशिस्त मोडून काढण्यासाठी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी सर्वच विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना कामाला लावले, हे आणखी एक स्वागतार्ह पाऊल आहे. आता शहरातील वाहतुकीचा विचका करणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. महापालिकेत ती धमक नसल्याने पोलीस आयुक्तांनी पुढाकार घेतला पाहिजे.

पिंपरी-चिंचवडचे पहिले पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक चांगले निर्णय घेतले. घरात साजरे होणारे वाढदिवस रस्त्यावर आणून राजरोसपणे धुडगूस घालणाऱ्यांना त्यांनी अटकाव केला. अतिउत्साही बर्थ डे बॉय आणि त्यांच्या शुभेच्छुकांना थेट तुरुंगात धाडण्याचा इशारा दिल्याचा चांगला परिणाम झाला. हे प्रकार जवळपास थांबले आहेत. रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी त्यांनी पोलीस यंत्रणा कामाला लावली. त्यामुळे काही ठिकाणी पोलिसांच्या भीतीने का होईना रस्ते खुले झाले.

आता आयुक्तांनी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनस्वारांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलीस तसेच खाकीतील पोलीस कर्मचाऱ्यांनाही दिले आहेत. अशी कारवाई करणाऱ्यांना पोलिसांना बक्षिसी देण्याचे त्यांनी जाहीर केले, हा स्तुत्य निर्णय आहे. त्यामुळे बेशिस्त वाहतुकीला आळा बसू शकेल. केवळ विरुद्ध दिशेने जाणाऱ्यांवर कारवाईपुरते मर्यादित न राहता पोलीस आयुक्तांना आणखी पुढचे पाऊल टाकावे लागणार आहे. शहरभरात जागोजागी वाहतुकीचा विचका झाला आहे, त्यामागे रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे कारणीभूत आहेत. त्यावर पालिकेने कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कारवाई करण्याची धमक नाही. पोलीस बंदोबस्त मिळत नाही, हे कारण पुढे करून अतिक्रमणांना संरक्षण देत पालिकेची खाबुगिरी सुरू असते, हे उघड गुपित आहे. राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर कोणालाही वाहतुकीच्या समस्या सोडवण्याची इच्छाशक्ती नाही. किंबहुना, त्यांच्यामुळेच ही समस्या दिवसेंदिवस हाताबाहेर चालली आहे. कासारवाडी-नाशिक फाटा-शंकरवाडी या पट्टय़ातील कार सुशोभीकरण करणाऱ्या व्यावसायिकांची सर्वाच्या नाकावर टिच्चून सुरू असलेली मनमानी हे एकमेव उदाहरण त्यासाठी पुरेसे ठरेल.

महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनस्वारांना आणि पादचाऱ्यांना दररोज प्रचंड त्रास होत असतानाही या ठिकाणी कोणतीही कार्यवाही होत नाही, यातच सर्वकाही आले. पालिकेने रस्ता रुंदीकरण करून प्रचंड मोठे रस्ते तयार केले. मात्र, सद्य:स्थितीत असा एकही रस्ता नसेल, जिथे वाहतूक कोंडी होत नाही. सर्वकाही दिसत असतानाही पालिकेकडून डोळेझाक केली जाते, यामागे केवळ हप्तेगिरी आहे.

आता पोलीस आयुक्तांनी पुढाकार घेतला, तरच काही चांगले चित्र दिसू शकेल. कशाही पद्धतीने वाहने लावून निघून जाणारे, रस्ता अडवून वाहने लावून थांबणारे, असे वाहतुकीचा विचका करणाऱ्या विविध घटकांवर कठोर कारवाई व्हायला हवी.

सोसायटीतही वाहतुकीचे नियम

वाकडच्या संस्कृती सोसायटीतील रहिवाशांनी स्वत:साठी केलेले नियम चर्चेचा विषय ठरले आहेत. सोसायटीच्या आवारात वाहन लावताना वाहतुकीचे नियम न पाळल्यास तसेच स्वत:ची पार्किंगची जागा सोडून इतरत्र वाहने लावल्यास त्या मोटारींना सुरक्षारक्षकांकडून जॅमर लावण्यात येते. दंड म्हणून सोसायटीत झाडे लावावी लागतात आणि त्या झाडाला पाणी घालावे लागते. सोसायटीतील सर्व सदस्यांच्या संमतीने हा उपक्रम राबवला जातो. रहिवाशांनी स्वत:हून हे नियम लागू करून घेतले आहेत. त्याचे अनुकरण इतर सोसायटय़ांनी करायला हरकत नाही.

 

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad police commissioner initiatives against road encroachments