पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून गेल्या साडेतीन वर्षात शहराला चार पोलीस आयुक्त लाभले आहेत. आतापर्यंतच्या तीनही पोलीस आयुक्तांना कार्यकाल पूर्ण करता आला नाही. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश रजेवर असताना त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे पोलीस दलातत्यांच्या बदलीची चर्चा आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांची दखल घेऊन शहरासाठी आयुक्तालय मंजूर करण्यात आले. १५ ऑगस्ट २०१८ रोजी आयुक्तालयाचे कामकाज सुरू करण्यात आले. आर. के. पद्मनाभन शहराचे पहिले पोलीस आयुक्त होते. पदावर असताना काही महिन्यातच ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी संदीप बिष्णोई आयुक्तपदावर आले. वर्ष पूर्ण होण्यापर्वीच त्यांची  बदली झाली.

सप्टेंबर २०२० मध्ये कृष्ण प्रकाश यांची पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली. मात्र, दीड वर्षातच त्यांची अचानक बदली करण्यात आली. कृष्ण प्रकाश काही दिवसांपासून रजेवर होते आणि ते परदेशात गेले होते. अशा वेळी त्यांची बदली करण्यात आल्याने अनेक तर्क लढवण्यात येत आहेत. नव्या पोलीस आयुक्तांना तातडीने पदभार स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गुरूवारी सकाळी नवे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आयुक्तालयात अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडून पदभार स्वीकारला. अकुंश शिंदे मुंबईत सुधार सेवा विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी सोलापूर, गडचिरोली भागात काम केले आहे. ते पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यात नियुक्तीवर आले आहेत. शहरातील सद्यस्थितीची माहिती घेऊन आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रसारमाध्यमांशी संवाद साधू, असे अंकुश शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.

Story img Loader