लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या अखत्यारित असलेल्या मावळ तालुक्यातील वडगाव, कामशेत, लोणावळा शहर आणि ग्रामीण ही चार पोलीस ठाणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला जोडण्याचा प्रस्ताव गृह विभागास पाठविण्यात आला आहे. तो मंजूर झाल्यास आयुक्तालयाच्या हद्दीत वाढ होणार आहे.
पुणे शहर व पुणे ग्रामीण दलाची विभागणी करून १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. त्या वेळी आयुक्तालयाच्या हद्दीत १४ पोलीस ठाणी होती. त्यानंतर चिखली पोलीस ठाणे कार्यान्वित झाले. रावेत, शिरगाव आणि म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे मंजूर झाले. त्यामुळे १८ पोलीस ठाणी होती. दोन महिन्यांपूर्वी वाकड, हिंजवडी, पिंपरी आणि भोसरी या पोलीस ठाण्यांचे विभाजन करून नव्याने अनुक्रमे काळेवाडी, बावधन, संत तुकारामनगर आणि दापोडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.
आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ लाख वृक्ष; महापालिकेचा दावा
आयुक्तालयांतर्गत आता २२ पोलीस ठाणी आहेत. आयुक्तालयाचे एकूण क्षेत्रफळ ११५ चौरस किमी इतके असून, अंदाजे ४० लाख इतकी लोकसंख्या येते. आळंदी-मरकळ, तळवडे, भोसरी, चाकण, हिंजवडी, तळेगाव दाभाडे ही औद्योगिक क्षेत्रे आयुक्तालयाच्या अखत्यारित येतात. मावळ तालुका हा निसर्गरम्य आणि वेगाने विकसित होणारा भाग म्हणून ओळखला जातो. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा, कामशेत यांसारख्या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. वडगाव आणि तळेगाव दाभाडे परिसरातील औद्योगिक विकासामुळे या भागाचा शहरीकरणाकडे झपाट्याने प्रवास सुरू आहे. मात्र, सद्य:स्थितीत कायदा-सुव्यवस्थेसाठी आवश्यक त्या सुविधा कमी पडत असल्याचे दिसते.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हे आधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, वेगवान आणि प्रभावी पोलीस सेवा देण्यात पुढारलेले मानले जाते. मावळमधील देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गतच आहेत. आता तालुक्यातील वडगाव, कामशेत, लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण ही चार पोलीस ठाणीही आयुक्तालयाला जोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याबाबत राज्य शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
आणखी वाचा-राज्यातील या शहराला मिळेना अतिरिक्त आयुक्त!
मावळ तालुक्यातील वडगाव, कामशेत आणि लोणावळा हा परिसर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला जोडण्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविण्यात आला आहे. शहर पोलीस दलात अतिरिक्त मनुष्यबळ, अधिकारी-कर्मचारी, आवश्यक साधनसामग्री उपलब्ध असल्याने हा परिसर जोडल्यानंतर येथील नागरिकांना तातडीने पोलीस मदत मिळण्यास फायदा होईल, असे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.