पिंपरी : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये तसेच तक्रारींचा वेळीच निपटारा व्हावा यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात दर शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. उद्या शनिवार (१८ मे) पासून हा उपक्रम सुरु होणार असून पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सर्व अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १८ पोलीस ठाणे आहेत. पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची हद्द मोठी आहे. पिंपरी-चिंचवड, चाकण, खेड-आळंदीसह तळेगाव दाभाडे हा औद्योगिक परिसर आयुक्तालयाच्या हद्दीत येतो. अनेकदा नागरिकांकडून येणाऱ्या अर्जावर काहीतरी कार्यवाही करण्यात येत असते. तर, काहीवेळेस यात थोडीफार दिरंगाई होऊ शकते. तक्रार निवारण दिनानिमित्त नागरिकांना तक्रारीवर झालेल्या कार्यवाही माहिती दिली जाईल. तसेच नागरिकांना आपल्या तक्रारी मांडता येतील. नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी आयुक्तालयामार्फत विविध माध्यमांद्वारे तक्रारी स्वीकारल्या जातात. यामध्ये संकेतस्थळ, व्हॉट्सअॅप, ई-मेल तसेच प्रत्यक्षरित्या पोलीस आयुक्त कार्यालय, उपायुक्त कार्यालय, सहायक पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस ठाणे यांचा समावेश आहे. तसेच शासन आणि वरिष्ठ कार्यालयांकडून वेगवेगळ्या प्रकारचे तक्रार अर्ज प्राप्त होत असतात. या प्राप्त तक्रार अर्जांची मुदतीत व उचित कार्यवाही करून त्याचे निराकरण करणे अपेक्षित आहे. तक्रार अर्जाची वेळेत कार्यवाही न झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होते.

हेही वाचा…पिंपरी : मोशीतील कोसळलेल्या होर्डिंगसंदर्भात समोर आली ही माहिती…दोघांवर गुन्हा दाखल

नागरिकांची ही गैरसोय टाळण्यासाठी तसेच नागरिकांना अधिकाऱ्यांकडे आपली कैफियत मांडता यावी, यासाठी सर्व पोलीस ठाण्यात दर शनिवारी सकाळी साडेदहा ते दुपारी दोन यावेळेत तक्रार निवारण दिन होणार आहे. पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त तसेच ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या तक्रारी सोडविल्या जाणार आहेत. तरी तक्रार दिनाच्या दिवशी तक्रारदारांनी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये हजर राहण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad police going to hold weekly complaint redressal day starting 18 may pune print news ggy 03 psg
Show comments