पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत पोलीस शिपाई भरती प्रक्रिया पार पडत आहे. भरती दरम्यान एक अनोखं चित्र पाहायला मिळालं. पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून एक महिला भरती प्रक्रियेसाठी पिंपरी- चिंचवडमध्ये मैदानी चाचणी देण्यासाठी दाखल झाली. त्यांच्याकडे असलेलं चार महिन्यांचं बाळ कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सांभाळलं. यामुळे एका महिलेची वेदना एक महिलाच समजू शकते असा एक संदेश यातून गेला असून खाकी वर्दीचं कौतुक होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महिला, पुरुष, तरुणी पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून विविध ठिकाणी भरती प्रक्रियेला सामोरे जात आहेत. पिंपरी- चिंचवडमध्ये देखील पोलीस शिपाई भरतीसाठी अनेक तरुण, तरुणी, महिला पिंपरी- चिंचवड मध्ये दाखल झाल्या आहेत. शहरातील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलन येथे भरती प्रक्रिया पार पडत आहे. आज महिलांची मैदानी चाचणी सुरू असून पहिल्या दिवशी ८६४ महिलांनी उपस्थित राहून ७२९ महिलांनी मैदानी चाचणी पूर्ण केलेली आहे. यात एक वेगळं चित्र बघायला मिळालं.

हेही वाचा : लोणावळा: आई एकविराच्या विश्वस्तपदी खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांची वर्णी; अजित पवारांच्या आमदाराने केली मदत

एक महिला चार महिन्याचं बाळ सोबत घेऊन मैदानी चाचणी देण्यासाठी सेंटरच्या ठिकाणी पोहोचली. त्या बाळाचं संगोपन करण्यासाठी कुणीही जवळ नातेवाईक नव्हतं. पोलीस होण्याचं स्वप्न स्वस्थ बसू देत नसल्याने ती महिला त्या बाळाला घेऊन भरती प्रक्रियेच्या ठिकाणी पोहोचली. हे चित्र बघून त्या चार महिन्यांच्या बाळाला महिला पोलीस कर्मचाऱ्याने आईची (महिला उमेदवार) दोन ते अडीच तास मैदानी चाचणी संपेपर्यंत सांभाळलं. कर्तव्यावर असलेल्या त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. एक महिलाच महिलेची व्यथा जाणू शकते. हे यातून स्पष्ट झालं आहे. महिलांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं, हे देखील यातून अधोरेखित झालं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad police recruitment female candidate comes with four month baby kjp 91 css