पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील हिंजवडी, रावेत, दिघी, देहूरोड, भोसरी आणि वाकड या पोलीस ठाण्यांचे संपूर्ण कामकाज नेहरूनगर न्यायालयात वर्ग करण्याची मागणी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री, विधी व न्यायमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘पूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातील न्यायप्रविष्ठ बाबी मोरवाडी न्यायालयातून चालत होत्या, मात्र आता नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम समोरील नवीन सुसज्ज इमारतीमध्ये न्यायालय स्थलांतरित झाले आहे. याठिकाणी दहा न्यायाधीशांची नेमणूक केली गेली आहे. दोन नवीन दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग न्यायालय) यांची नियुक्ती होणार आहे’.
‘सध्या हिंजवडी, देहूरोड, भोसरी आणि वाकड पोलीस ठाण्याचे कामकाज पुणे, खडकी आणि वडगाव मावळ न्यायालयात चालते. यामुळे नागरिकांचा, वकिलांचा वेळ आणि पैशांचा मोठा अपव्यय होत आहे. नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचविण्यासाठी तसेच न्यायालयीन प्रक्रिया सोयीस्कर होण्यासाठी नेहरूनगर न्यायालयात हे कामकाज वर्ग करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे नागरिकांच्या प्रवासाचा वेळ कमी होईल आणि प्रशासनाच्या कामकाजामध्ये गती येईल’, असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
‘पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन व आमदार महेश लांडगे यांच्या यशस्वी पाठपुराव्याने जर पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे कामकाज नेहरूनगर न्यायालयात वर्ग झाले तर निश्चितच शहरातील नागरिकांना न्यायव्यवस्थेची प्रक्रिया आणखी सुलभ होईल’, असे ॲड. मंगेश खराबे यांनी म्हटले आहे.