पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी चक्क आरोपींवर झाड फेकलं. त्यानंतर आरोपी खाली पडले आणि मग त्यांना ताब्यात घेण्यात आलं. हे झाड ८ ते १० फुटांच्या उंचीचं असून त्याचा बुंदा मोठा होता, अशी माहिती पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आरोपींकडून दोन पिस्तुलं जप्त करण्यात आली आहेत.
पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अकराच्या सुमारास योगेश जगताप खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गणेश मोटे, अश्विन चव्हाण आणि महेश माने हे चाकण परिसरातील कोये येथे लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, गुंडा स्कॉड चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, सांगवी पोलीस ठाण्याचे सतीश कांबळे, यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या कारवाईमध्ये स्वतः पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे सहभागी होते.
हेही वाचा – पुणे : खुनातील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार; पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश किरकोळ जखमी
आरोपी कोये येथील शेतातील एका घरात लपल्याची माहिती पोलिसांना होती. त्यानुसार, सापळा लावण्यात आला, पोलिसांनी चार गट केले. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागल्याने आरोपी गणेश मोटे, अश्विन चव्हाण आणि महेश माने डोंगराच्या दिशेने पळाले. दरम्यान, त्यांनी पोलिसांवर दोन गोळ्या झाडल्या. याला प्रत्युत्तर देत सतीश कांबळे आणि सुनील टोणपे यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून त्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. यानंतर, ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. पळून जात असताना आयर्न मॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ८ ते १० फूट उंचीचं आणि मोठा बुंदा असलेलं झाड त्यांच्या अंगावर फेकलं. यामुळे आरोपी खाली पडले आणि त्यांना इतर पोलीस अधिकाऱ्यांनी पकडलं अशी माहिती पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिली आहे.
योगेश जगताप खुनाप्रकरणी आत्तापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य गोळीबार करणारे गणेश मोटे, अश्विन चव्हाण हे फरार होते. त्यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात म्हणजे दिनांक १८ डिसेंबर रोजी योगेश जगताप चा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. योगेश जगताप वर देखील काही गुन्हे दाखल होते अशी माहिती सुनील टोणपे यांनी दिली आहे.