पिंपरी-चिंचवड: धुळवडीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात २५ ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्हच्या संदर्भात विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये २७२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांमध्ये हे खटले कोर्टात पाठवले जाणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळवडीचा सण साजरा होत असताना काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ड्रंक अँड ड्राईव्हच्या संदर्भातदेखील वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. सकाळी सात ते रात्री दहापर्यंत तब्बल २७२ तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयातील २५ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. सांगवी वाहतूक विभाग ते तळवडे, देहूरोड, तळेगाव, रावेत, हिंजवडी, वाकड, भोसरी, चिंचवड, अशा प्रत्येक ठिकाणी ही विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. २७२ जणांवरील खटले पुढील काही दिवसांमध्ये कोर्टात पाठवले जातील. पुढील कारवाई कोर्टातून होईल अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली आहे.

Story img Loader