लोकसभा निवडणुकीचा कौल स्पष्ट होण्याची वाट न पाहताच पिंपरी-चिंचवडच्या राजकीय पटलावर विधानसभा निवडणुकांचे डावपेच सुरू झाले आहेत. लोकसभेप्रमाणे शहराच्या विधानसभेच्या राजकारणातही राष्ट्रवादी व शिवसेनेत थेट सामना आहे. दुसरीकडे, काँग्रेससाठी चिंचवड, भाजपसाठी पिंपरी आणि राष्ट्रवादीची मावळ विधानसभेसाठी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादीतील आघाडीच्या जागावाटपानुसार राष्ट्रवादीकडे भोसरी व पिंपरी मतदारसंघ असून काँग्रेसकडे चिंचवड आहे. तर, महायुतीच्या वाटपात चिंचवड, भोसरी शिवसेनेकडे व पिंपरी (राखीव) भाजपकडे आहे. २००९ च्या निवडणुकीत या तीनही विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढती झाल्या, यंदाही तशीच चुरस राहील, अशी चिन्हे आहेत. भोसरीत राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार मंगला कदम यांच्या विरोधात बंडखोर विलास लांडे निवडून आले. शिवसेनेच्या सुलभा उबाळेंनी लांडेंना खऱ्या अर्थाने लढत दिली. चिंचवडची जागा काँग्रेसला सुटली असताना शहराध्यक्ष भाऊसाहेब भोइरांच्या विरोधात राष्ट्रवादीने बंडखोरी घडवून आणली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या छुप्या पािठब्यावर लक्ष्मण जगताप निवडून आले. शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी जगतापांना कडवी लढत दिली होती. पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी भाजपचे अमर साबळे यांचा पराभव केला. तत्कालीन लोकसभेच्या दोन जागा गमावूनही राष्ट्रवादीने विधानसभेच्या तीनही जागाजिंकल्या होत्या. त्यानंतर पालिका निवडणुकीतही राष्ट्रवादीने घवघवीत यश मिळवले.
अलीकडे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शहरात बरीच राजकीय उलथपालथ झाली असून त्याचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकीत उमटणार आहेत. तथापि, लोकसभेचा कौल स्पष्ट होण्यापूर्वीच विधानसभेसाठी सगळे कामाला लागले आहेत. पुन्हा तीनही जागाजिंकण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे आहेत. याशिवाय, वर्षांनुवर्षे भाजपकडे असलेला मावळ विधानसभा मतदारसंघजिंकण्याची अजितदादांची प्रबळ इच्छा आहे. त्या दृष्टीने राष्ट्रवादीची व्यूहरचना सुरू आहे. भोसरी, पिंपरीत राष्ट्रवादीला चांगलीच डोकेदुखी होणार आहे. आझम पानसरे पक्षात आल्याने काँग्रेसचे बळ वाढले आहे, त्याचा उपयोग चिंचवड विधानसभेसाठी होणार का, असा मुद्दा आहे. काँग्रेसकडून ऐनवेळी चिंचवडऐवजी पिंपरी विधानसभेची मागणी होण्याची शक्यताही आहे. भाजपला पिंपरीतील पराभवाचे उट्टे काढायचे आहेत. मात्र, महायुतीतच ओढाताण असल्याने ती वाट अडचणीची आहे. मावळात गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा उमेदवार निवडून येत असल्याने अस्वस्थ असलेल्या अजितदादांनी यंदा कोणत्याही परिस्थितीत मावळात राष्ट्रवादीचा गजर करण्याचे गणित मांडले आहे.
लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीच पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभेसाठी ‘डावपेच’ –
लोकसभा निवडणुकीचा कौल स्पष्ट होण्याची वाट न पाहताच पिंपरी-चिंचवडच्या राजकीय पटलावर विधानसभा निवडणुकांचे डावपेच सुरू झाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-05-2014 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad politic election effect