पिंपरी : पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वतीने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर विशेष मोहीम राबवली जात आहे. वायुवेग पथकाकडून एक डिसेंबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ या चार महिन्यांच्या कालावधीत सात हजार ३१० वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. १७ हजार १५६ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, ११ हजार ७० जणांचे समुपदेशन करण्यात आले आहे.
अति वेगामुळे गेल्या काही वर्षांपासून महामार्गावर अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. सध्या बाजारात अति वेगाने धावणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांना तरुणांची मोठी मागणी आहे. कंपनीकडून वाहनांची एक निश्चित वेग मर्यादा ठेवण्यात येत असतानाही अनेक वाहन चालक स्पीड मीटरमध्ये छेडछाड करतात. दुसरीकडे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाय योजना केल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून महामार्गावरील वाहनांचा वेग पाहून कारवाई करणे, लेन कटिंग, सीटबेल्ट न लावणाऱ्या वाहन चालकांवर पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत कारवाई करण्यात येत आहे.
अतिवेगाप्रकरणी दोन हजार ६८२ जणांवर कारवाई
अतिवेगाप्रकरणी सर्वाधिक दोन हजार ६८२ जणांवर कारवाई झाली आहे. एक हजार ५५६ वाहन चालकांवर लेन कटिंग, दोन हजार १२८ वाहन चालकांवर सीट बेल्ट न लावणे, ३४७ चालकांवर चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे, वाहन चालविताना मोबाईल फोनवर बोलणाऱ्या चौघांवर कारवाई करण्यात आली आहे. फिटनेस प्रमाणपत्र नसणाऱ्या ३९, विमा नसलेल्या ५५, परमिट नसलेल्या दहा तर ३८ प्रवासी बसमध्ये सामानाची वाहतूक करत असल्याचेदेखील या तपासणीत आढळून आले. २९४ वाहन चालकांवर विविध कारणांमुळे कारवाई करण्यात आली आहे. तसेच वायुवेग पथकाने चार महिन्यांत ११ हजार ७० वाहन चालकांचे वाहतुकीचे नियम पाळावेत, रस्त्यावरील शिस्त पाळावी याबाबत समुपदेशन केले.
हेही वाचा – लंडनमधील ऐतिहासिक रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये पुण्यातील ४२ विद्यार्थ्यांना वादनाची संधी
द्रुतगती मार्गावर गेल्या चार महिन्यांपासून वायूवेग पथकामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. १७ हजार १५६ वाहनांची तपासणी करण्यात आली. सात हजार ३१० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहन चालकांनी वेगाने वाहने चालवू नयेत. सीटबेल्टचा वापर करावा. लेन कटिंगचे नियम पाळावेत. वाहतुकीचे नियम पाळून वाहने चालवावीत, असे पिंपरी चिंचवड कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अतुल आंदे.