चीनमधील प्रगत शांघाय शहराशी पिंपरी-चिंचवडचा मैत्री करार होणार असून दोन्हीकडील औद्योगिक क्षेत्रातील उपयुक्त बाबींचे आदान-प्रदान करण्यात येणार आहे. केंद्र व राज्यसरकारची मान्यता, तसेच पालिका सभेच्या मंजुरीनंतर याबाबतची अंमलबजावणी होणार आहे. अशाप्रकारे करार करणारे पिंपरी राज्यातील पहिलेच शहर असल्याची माहिती महापौर मोहिनी लांडे व आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. पालिकेतील २८ विभागांच्या सविस्तर माहितीसाठी एकच ‘हेल्पलाईन’ सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुक्त म्हणाले,‘‘यू झुई, यान लू यांच्या नेतृत्वाखाली शांघायचे शिष्टमंडळ शहरात आले होते. शांघायने महिन्यापूर्वी पिंपरीशी मैत्री करार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून दोन्हीकडील संवाद सुरू होता. अखेर, मैत्रीचा करारनामा करण्याचे ठरले. दोन्ही औद्योगिक शहरे असून त्यांच्यात परस्पर सहकार्य असावे, असा  विचार त्यामागे आहे. याबाबतचा प्रस्ताव सभेत मांडण्यात येईल. तेथील मान्यतेनंतर केंद्र व राज्यशासनाची मंजुरी घ्यावी लागेल व त्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडेल.’’  महापौर व पदाधिकाऱ्यांना त्यांनी शांघाय भेटीचे निमंत्रण दिले आहे.
नागरिकांना पालिकेच्या २८ विभागाची माहिती देणाऱ्या ‘सारथी’ नावाच्या हेल्पलाईनचे उद्घाटन १५ ऑगस्टला अजितदादांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर त्याचा क्रमांक जाहीर करण्यात येणार आहे. सकाळी सात ते रात्री दहा या वेळेत मराठीत माहिती दिली जाणार आहे. डॉ. टेकाळे यांच्याकडे याची प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अशाप्रकारे सुविधा देणारी पिंपरी पालिका एकमेव असल्याचा दावाही करण्यात आला. या माहितीचा समावेश असलेली पुस्तिका तयार करण्यात आली असून त्याचे प्रकाशन अजितदादांच्या हस्ते होणार आहे. ही सुविधा तक्रारी देण्यासाठी नाही. महत्त्वाची घटना तसेच माहिती देण्यात आल्यानंतर त्याची दखल घेऊ, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. पालिका आयुक्त व सत्तारूढ पदाधिकाऱ्यांमधील संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंपरी दौऱ्यानंतर सोमवारी वेगळे चित्र दिसून आले. सर्वानी एकत्रितपणे पालिकेच्या विकासकामांची माहिती दिली. पक्षनेत्या मंगला कदम, उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सहायक आयुक्त डॉ. उदय टेकाळे, संगणक विभागाचे प्रमुख नीलकंठ पोमण आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा