पिंपरी-चिंचवडमध्ये आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणित बदलू लागली आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपाने जोरदार ताकद लावण्यास सुरू केले असून आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप आणि इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला असून राजकीय चर्चेला उधाण आले आहे. ते, खासदार श्रीरंग बाराने यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांची पत्नी नगरसेविका असून त्या शिवसेना पक्षात आहेत. चिंचवडे हे शिक्षण मंडळाचे माजी सदस्य देखील आहेत. शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे त्यांनी भाजपात पक्ष प्रवेश केल्याची जोरदार चर्चा आहे.
या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनाला पिंपरी-चिंचवड शहरात खिंडार पडले आहे. चिंचवडे यांना भाजपमध्ये आणण्यात आमदार लक्ष्मण जगताप यांची मोठी भूमिका असल्याचं बोललं जातं आहे. येणाऱ्या काळात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी किती कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपले पक्ष बदलून इतर पक्षात जातात ते पाहणे महत्वाचे आहे.
खेल अभी बाकी है मेरे दोस्त….
भाजपाच्या फेसबुक पेजवर “खेल अभी बाकी है मेरे दोस्त” अस म्हणत आणखी काही नेते, स्थानिक पदाधिकारी हे भाजपच्या रडारवर असून त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, ते नेते आणि पदाधिकारी कोण आहेत हे प्रवेशानंतर कळेल.