आम्हाला विचारात न घेता कुणाचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश झाल्यास त्या आयात उमेदवाराचे आम्ही काम करणार नाहीत. असा ठराव पिंपरी- चिंचवड शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज आकुर्डी येथील सेना भवन मध्ये करण्यात आला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले, संजोग वाघेरे, सुलभा उबाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. अजित पवार गटाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली. भोंडवे यांच्या प्रवेशाला पिंपरी- चिंचवडच्या शिवसैनिकांनी विरोध केला आहे.

हेही वाचा >>> पुणे : डेअरीत आग लागून मालकाचा मृत्यू, सुखसागरनगर भागातील घटना

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटात जोरदार इन्कमिंग सुरू आहे. अनेक इच्छुक नेत्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे. आज देखील चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशाबाबत पक्षश्रेष्ठीने स्थानिक शिवसैनिकांना विश्वासात न घेतल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आकुर्डी येथील सेना भवन मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यासह संजोग वाघेरे, सुलभा उबाळे आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा >>> पुणे : बाणेर टेकडीवर तरुणींना लुटणारा चोरटा गजाआड, अल्पवयीन साथीदार ताब्यात

आयात उमेदवाराला उमेदवारी दिल्यास त्या उमेदवाराचं काम करायचं नाही. असा ठाकरे गटाच्या वतीने ठराव करण्यात आला आहे. निष्ठावंत शिवसैनिकांवर हा अन्याय असल्याचं सचिन भोसले यांनी म्हटल आहे. कुणी पक्ष वाढीसाठी पक्ष प्रवेश करत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो. परंतु, कुणी उमेदवारीसाठी पक्षात प्रवेश करत असेल तर आम्ही त्या व्यक्तीचं काम करणार नाहीत. असा सर्वानुमते ठराव झाल्याची माहिती शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश करणाऱ्या मोरेश्वर भोंडवे यांना पक्षश्रेष्ठी उमेदवारी देणार का?, की पिंपरी- चिंचवड मधील शिवसैनिकांचीपक्षश्रेष्ठी समजूत काढणार हे बघावं लागेल.