पिंपरी : राज्यातील जनतेचा महाविकास आघाडीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडीच्या १६० ते १६५ जागा येतील आणि महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री हाेईल. २३ नोव्हेंबरनंतर राज्यात महायुती दिसणार नाही. निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भवितव्य अंधकारमय असेल, असा दावा शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला. चिंचवडचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्राचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे पुण्याचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, संजोग वाघेरे यावेळी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्या प्रचार सभांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महायुती सरकारला उखडून फेकायचे आहे, हे लाेकांनी ठरवले असल्याचे सांगून राऊत म्हणाले, की भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बाेलतात, यावर महाराष्ट्र चालत, हालत, डुलत नाही. त्यांचा काळ हाेता, ताे आता निघून गेला. २०१४ मध्ये खाेट्या कथानकांवर (नॅरेटिव्ह) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य आले. खोटे कथानक हा शब्द भाजपचा आहे. भाजपने २०१४ पासून देशात, महाराष्ट्रात वेगळे काहीच केले नाही. आता खोट्या कथानकाची संकल्पना त्यांच्यावर उलटताना दिसत आहे. भाजप या गुंत्यात अडकून पडला आहे.

हेही वाचा : पिंपरी : भ्रष्टाचार करणाऱ्यांना प्रायश्चित्त मिळालेच पाहिजे; जयंत पाटील यांचे विधान

महाविकास आघाडीत शहरातील तीन विधानसभा मतदार संघापैकी एक जागा शिवसेनेला (ठाकरे) मिळावी, अशी आमची भूमिका हाेती. सक्षम उमेदवार होते. परंतु, आघाडीमध्ये काही गाेष्टी मिळवताना काही गाेष्टी गमवाव्या लागतात. त्यामुळे सुरूवातीला पदाधिकारी नाराज झाले. उमेदवारी मिळाली नाही म्हणून कोणी पक्ष साेडला नाही. इच्छुक स्वतःहून प्रचारात उतरले आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे माजी नगरसेवक माेरेश्वर भाेंडवे यांनी उमेदवारीसाठी शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला होता. त्यांना उमेदवारी मिळावी, असा आमचा प्रयत्न हाेता. शिवसेनेला चिंचवडची जागा मिळाली असती, तर त्यांनाच उमेदवारी दिली असती. पण जागा आम्हाला मिळाली नाही. त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे, त्यामुळे पक्षाची बंधने आणि शिस्त पाळावी. त्यांना समजाविण्याचा प्रयत्न सुरू आहे. काेणी काही केले तरी चिंचवडमधून राहुल कलाटे विजयी हाेतील, अशी माझी पक्की खात्री आहे. कलाटे प्रथमच पक्षाच्या अधिकृत चिन्हावर उभे आहेत. आम्ही त्यांना लाेकसभा निवडणूक लढा असे सांगत हाेताे. परंतु, आता हातात तुतारी घेऊन आमच्या सर्वांच्या पाठिंब्याने कलाटे विधानसभेत जातील.

हेही वाचा : चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

महाविकास आघाडीची सांगता सभा होणारच

१७ नाेव्हेंबर राेजी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. मुंबईतील स्मृती, प्रेरणा स्थळावर राज्याच्या कानाकाेप-यातून लाखाे लाेक श्रध्देने येतात. सत्ताधारी त्यांना शिवतिर्थावर येण्यापासून अडवणार असतील तर चुकीचे आहे. सभेला परवानगी द्यायची की नाही, हा पुढचा प्रश्न आहे. पण १७, नाेव्हेंबरला शिवसेना ( ठाकरे) पक्षाच्या सभेला परवानगी देणे अधिक साेईचे हाेईल. कारण, संध्याकाळपर्यंत तिथे शिवसैनिकांचा राबता राहिल. संध्याकाळी गर्दी जमा हाेणार, त्यांना अडविल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेईल. प्रशासनाला निवडणुकीच्या ताेंडावर अशा गाेष्टी करायच्या असतील तर त्यांनी अशा प्रकारचे निर्णय घ्यावेत. पण, १७ तारखेला आमची सांगता सभा हाेणारच, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad shivsena ubt mp sanjay raut on future of eknath shinde after 23rd november vidhan sabha election result pune print news ggy 03 css