पिंपरी-चिंचवड शहरातील झोपड्यांचं रुपडं पालटण्याची एक विशेष मोहिम सध्या हाती घेण्यात आलीय. शहरात तशा शेकडो झोपडपट्ट्या आहेत मात्र अनेक ठिकाणी मुख्य रस्त्याच्या कडेला देखील या झोपडपट्ट्या असल्याने रस्ते विद्रुप दिसतात. त्यामुळेच महानगर पालिकेमार्फत मुख्य रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झोपडपट्ट्यांवर रंगरंगोटी केली जात आहे. त्यामुळं या झोपडपट्ट्यांना एकदम फ्रेश लूक आलाय.
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झोपडपट्ट्यांमुळे शहर विद्रूप दिसत असल्याच्या निरक्षणानंतर शहर सुधार समितीच्या सभापती अनुराधा गोरखे यांनी महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे रस्त्याच्याकडेला असणाऱ्या झोपडपट्ट्यावर रंगरंगोटी करून सुशोभीकरण करावे अशी मागणी केली होती. त्याला आयुक्त राजेश पाटील यांनी प्रायोगिक तत्वावर मान्यता दिली आहे. त्यानुसार, वेड्यावाकड्या दिसणाऱ्या झोपडपट्टीवर रंगरंगोटी करण्यात येत आहे. त्यामुळे या झोपड्या आर्षिक दिसू लागल्या.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: नाही.. नाही.. ही काही आर्ट गॅलरी नाही, या आहेत पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्ट्या
सध्या शहरातील आण्णासाहेब मगर नगर झोपडपट्टीच्या दर्शनी भागावर प्रायोगिक तत्वावर सुशोभिकरण केलं जात आहे. येथील समोरील भाग रंगरंगोटी केल्याने अत्यंत सुंदर आकर्षक दिसत आहे. दरम्यान, काही झोपडपट्ट्याची रंगरंगोटी करून झाल्यास त्यानंतर हा उपक्रम शहरभर राबवायचा की नाही यावर आयुक्त राजेश पाटील निर्णय घेणार आहेत, अशी माहिती अमित गोरखे यांनी दिली आहे.