लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात २७० ठिकाणी वायफाय सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला खरा; मात्र केवळ १२४ ठिकाणीच वायफाय यंत्रणा जोडण्यात आली. त्यांपैकी महापालिका मुख्यालय आणि वायसीएम रुग्णालय अशा दोनच ठिकाणी प्रत्यक्षात वायफाय सुविधा सुरू करण्यात आली. इतर ठिकाणी वायफाय यंत्रणा कार्यान्वित करण्यात स्मार्ट सिटीला अपयश आले आहे.
शहरातील नागरिकांना प्रशासकीय कामे करण्यासाठी आणि प्रशासनाला अंतर्गत कामकाज सुकर करण्यासाठी स्मार्ट सिटीने शहरातील २७० ठिकाणी वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या सुविधेमुळे डिजिटल किऑक्स, संदेश दर्शविणारे डिजिटल फलक, स्मार्ट जलमापके, शहरातील रहिवासी या सर्वांचा समावेश असलेल्या परिसंस्थांना (इकोसिस्टीम) सक्षम करण्यात येणार आहे.
आणखी वाचा-नाच रे मोरा…दुर्गादेवी टेकडीवर मोरांचा मुक्त संचार
महापालिका मुख्य इमारत, महापालिकेची रुग्णालये, क्षेत्रीय कार्यालये, शाळा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) केंद्र यांना सिटी नेटवर्क अंतर्गत निगडीतील ‘इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर’ला जोडण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व ठिकाणी वायफाय सुविधा असणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी चालणारे कामकाज कंट्रोल अँड कमांड सेंटरमधून हाताळणे शक्य होणार आहे.
प्रशासकीय कामकाजासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात, रुग्णालयांमध्ये, शाळांना भेट देणाऱ्या नागरिकांना वायफाय सुविधेचा लाभ घेऊन ऑनलाइन पद्धतीने प्रशासकीय कामकाज करणे सोईचे ठरणार आहे. यासाठी सिटी वायफाय अंतर्गत विदा (डेटा) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरातील २७० ठिकाणांपैकी १२५ ठिकाणी वायफाय नेटवर्क जोडण्याचे काम पूर्ण झाले. त्यातील केवळ दोनच ठिकाणी वायफाय सुरू करण्यात स्मार्ट सिटीला यश आले आहे.
आणखी वाचा-प्रवासी वाऱ्यावर! ऐन दिवाळीत खासगी बसच्या भाडेवाढीचा तिढा
वायसीएम रुग्णालय, महापालिका इमारतीमधील तीन मजल्यांवर ही सुविधा आहे. दोन्ही ठिकाणी दिवसाला दीड हजार नागरिक सेवेचा लाभ घेत आहेत. यामध्ये नागरिकांना दोन जीबी डेटा विनाशुल्क देण्यात येत आहे. त्यात वाढ करून पाच जीबी डेटा देण्याचा विचार सुरू आहे. -नीळकंठ पोमण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका