पिंपरीत बुधवारी सकाळी प्रवाशांनी एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर एसटी आगारातील चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. काही स्थानिक लोक खासगी वाहन घेऊन नातेवाईकांना एसटी स्टँडवर सोडायला आले होते. यावेळी त्यांनी वाहन नो पार्किंग क्षेत्रात लावले होते. या कारणावरून वल्लभनगर-विटा या एसटी चालकाचा आणि त्यांचात वाद सुरू झाला. त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. यावेळी सगळ्यांनी मिळून एसटी चालकाला मारले. त्यामुळे संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळपासून बंद पुकारला आहे. वरिष्ठांनी दखल घेईपर्यंत आणि पोलिसांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक करेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही दिवसांमध्ये एसटी चालकाला मारहाण करण्यात आल्याची ही पाचवी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच भिवंडी येथे अशाचप्रकारच्या वादात रिक्षाचालकांकडून करण्यात आलेल्या मारहाणीत एसटी चालक प्रभाकर गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ मुंबई सेंट्रल, ठाणे, परळ आणि पनवेल एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनीही बंद पुकारला होता. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्याप्रमावर हाल झाले होते.

एसटी बसचालक प्रभाकर गायकवाड भिवंडी डेपोमध्ये बस नेत असताना प्रवेशद्वाराजवळ रिक्षा उभी होती. त्यावेळी गायकवाड यांनी चालकाला रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. रिक्षाचालकाने त्यांना न जुमानता रिक्षा हलवली नाही. त्यावेळी एसटी आत नेताना रिक्षाला बसचा धक्का लागला. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यात रिक्षाचालकांनी गायकवाड यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत गायकवाड यांचा मृत्यू झाला. दरम्यान, प्रभाकर गायकवाड यांचा मृत्यू मारहाणीमुळे नव्हे तर हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालात समोर आली होती.  शवविच्छेदनाच्या अहवालानुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असून शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी गायकवाड यांच्या नातेवाईकांना दाखवले असून त्यात कोणतीही मारहाण झाली नसून गायकवाड पोलीस ठाण्यातून बाहेर निघताना अचानक कोसळल्याचे दिसत असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad st deop stirke by empolyees after passanger bitting st driver