लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणावर ४१२ हरकती आल्या आहेत. यामध्ये ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये सर्वाधिक शंभर, तर सर्वांत कमी ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयात १४ हरकती आल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी घेऊन त्या निकाली काढल्या जाणार आहेत. त्यानंतर शहर फेरीवाला समितीच्या मान्यतेनंतर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. सर्वेक्षणात आठ क्षेत्रीय कार्यालयांत १८ हजार ६०३ फेरीवाले आढळून आले आहेत. यापूर्वी शहरात नऊ हजार २५ फेरीवाल्यांची नोंद होती. तब्बल नऊ हजार ५७८ फेरीवाले वाढले आहेत.

उद्योग, कष्टकऱ्यांची नगरी अशी ओळख असलेल्या शहरात कामगार, कष्टकरी, उद्योजक यांचा अधिवास अधिक आहे. शहरात फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. महापालिकेच्या वतीने शहरातील पथारीवाल्यांचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात आठ क्षेत्रीय कार्यालयांत १८ हजार ६०३ फेरीवाले आढळून आले आहेत. यापूर्वी शहरात नऊ हजार २५ फेरीवाल्यांची नोंद होती. तब्बल नऊ हजार ५७८ फेरीवाले वाढले आहेत.

आणखी वाचा-पुण्यातील काँग्रेसला उशिरा का होईना आली जाग… आता दर सोमवारी बैठक

शहरात सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात फेरीवाले आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिकेने या सर्वेक्षणावर हरकती मागविल्या होत्या. यामध्ये ४१२ हरकती आल्या आहेत. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक शंभर, ‘ह’ मध्ये ९१, ‘फ’ मध्ये ६०, ‘ग’ मध्ये ४५, ‘ब’ मध्ये ४३, ‘ड’ मध्ये ३३, ‘क’ मध्ये २६ तर सर्वांत कमी ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयात १४ हरकती आल्या आहेत. या हरकतींवर सध्या काम करण्यात येत आहे.

महापालिकेने बनावट सर्वेक्षण केले आहे. हरकतींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. चुकीचे काम झाकण्यासाठी खासगी संस्थेकडून हरकती स्वीकारल्या जात नाहीत. फेरीवाला प्रमाणपत्र असणाऱ्यांची नावेदेखील सर्वेक्षणातून गायब केली आहेत. खासगी संस्थेने मनमानी पद्धतीने केलेले सर्वेक्षण रद्द करण्यात यावे. -काशिनाथ नखाते, अध्यक्ष, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ

फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणावर ४१२ हरकती आल्या आहेत. या हरकतींची सुनावणी घेऊन त्या निकाली काढल्या जाणार आहेत. क्षेत्रीय कार्यालयांना फेरीवाला झोन करण्यासाठी जागा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. -विजयकुमार सरनाईक, सहायक आयुक्त, भूमी व जिंदगी विभाग