पिंपरी : ‘माझ्या निधनानंतरही काम बंद नाही झाले पाहिजे,’ या रतन टाटा यांच्या इच्छेचा मान राखून पिंपरी-चिंचवडमधील टाटा मोटर्स कंपनी गुरुवारीही सुरू राहिली. सर्व कामगारांनी नेमून दिलेले काम केले. अर्थात, रतन टाटा यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोरकी भावना मात्र ते लपवू शकले नाहीत. अनेक कामगार त्यांच्याबद्दल बोलताना भावुक होत असल्याचे दृश्य कंपनीत होते.
‘मी गेल्यानंतर उद्याेग, व्यवसायावर काेणताही परिणाम हाेता कामा नये,’ अशी रतन टाटा यांची इच्छा हाेती. त्यानुसार, त्यांनीच घालून दिलेल्या आदर्शानुरूप टाटा मोटर्सचे काम त्यांच्या निधनानंतर गुरुवारीही सुरू राहिले. त्याच वेळी केंद्र सरकारने रतन टाटा यांना मरणाेत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी कामगारांनी एकमुखाने केली. टाटा माेटर्स युनियनचे अध्यक्ष शिशुपाल ताेमर यांनी ही माहिती दिली. ‘रतन टाटा यांनी पिंपरी-चिंचवडमधील टाटा मोटर्स प्रकल्पामध्येच निवृत्ती घोषित केली होती. त्यांनी सर्व कामगारांशी संवाद साधला होता. ते नेहमी कामगार युनियनचा सन्मान राखत हाेते. आमच्यासाठी हा खूप दु:खद दिवस आहे,’ असेही तोमर म्हणाले.
हेही वाचा : “…अन् मी रतन टाटांकडून नम्रतेचा धडा घेतला”, नारायण मूर्तींनी सांगितली जुनी आठवण!…
टाटा माेटर्स युनियनचे माजी सरचिटणीस एकनाथ पवार म्हणाले, ‘१९९८ मध्ये कामगारांच्या पैशातून जेआरडी टाटांचा पुतळा कंपनी आवारात उभारण्यात आला. या पुतळ्याचे लाेकार्पण रतन टाटा यांच्या हस्ते झाले हाेते. कामगारांनी पुतळा उभा केल्याने टाटा यांना प्रचंड आनंद झाला, ते भावुक झाले हाेते. ते कायम कामगारांचे प्रश्न जाणून घ्यायचे. हिमालयाएवढी उंची असलेले टाटा सर्वसामान्य कामगारांबराेबर बसून जेवण करायचे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही मुंबईला गेलाे असता, आमचे त्यांनी आदराने स्वागत केले. जेवल्याशिवाय साेडले नाही. आणि, वर प्रवेशद्वारापर्यंत साेडण्यासही आले.’
‘आमचे दैवत आज हरपले. टाटा माेटर्सवर अवंलबून असलेल्या उद्याेगांचा पाेशिंदा हरपला आहे,’ अशी भावना युनियनचे माजी पदाधिकारी नामदेव ढाके यांनी व्यक्त केली. ‘सन २०१७ मध्ये टाटा मोटर्स युनियन आणि व्यवस्थापनामध्ये संघर्ष सुरू होता. तेव्हा आम्ही रतन टाटा यांना भेटलो होतो. आमच्यात अर्धा तास चर्चा झाली. त्यांनी आम्हाला काळजी करू नका, तुम्हाला हवे तसे होईल, असे सांगितले. त्यांनी प्रत्येक वेळी दिलेला शब्द पाळला. युनियन टाटा साहेबांच्या शब्दाबाहेर कधीच नव्हती. आज टाटा साहेब गेल्यामुळे आम्ही पाेरके झालाे,’ असे ढाके म्हणाले.
युनियनचे माजी अध्यक्ष सचिन लांडगे म्हणाले, ‘कठीण प्रसंगावर कशी मात करायची, त्यातून मार्ग कसा काढायचा, हे आम्हाला रतन टाटा यांनी शिकवले. कामगारांबद्दल त्यांना प्रेम, आत्मीयता हाेती. त्यांच्यासारखा देवमाणूस पुन्हा हाेणे नाही.’
पिंपरी-चिंचवडशी अतूट नाते
पिंपरी-चिंचवड शहरात टाटा माेटर्स कंपनी सन १९६८ मध्ये आली. अनेक लहान-माेठे उद्याेग या कंपनीवर अंवलबून आहेत. सद्यस्थितीत कंपनीत दहा हजार कायमस्वरूपी, तर ३० हजार कंत्राटी असे ४० हजार कामगार कार्यरत आहेत. टाटा गृहिणी या विभागामार्फत शहरातील अनेक महिलादेखील टाटा उद्योगाशी जोडल्या गेल्या. काही वर्षांपूर्वी शहरातील उद्योग स्थलांतर करू लागले होते. त्या वेळी रतन टाटा यांनी, ‘शहरातील टाटा उद्योग स्थलांतरित होणार नाही,’ अशी ठाम भूमिका घेतली. या भूमिकेमुळे अनेक उद्योगांचे स्थलांतर थांबले आणि शहराला स्थैर्य लाभले. पिंपरी-चिंचवड शहराचे औद्योगिकनगरी हे नाव सार्थ ठरविण्यामध्येही टाटा उद्योग समूहाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. अनेक लघुउद्योग शहरात सुरू होऊन बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. अनेकांचे जीवनमान उंचावण्यासाठी यामुळे मदत झाली.