पिंपरी चिंचवड : बदलापूर घटनेनंतर अनेक अल्पवयीन मुली तक्रारी देण्यासाठी पुढे येत आहेत. अशीच एक घटना समोर आली असून, शिक्षकाच्या नावाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पी.टी. शिक्षकाच्या विरोधात बारा वर्षीय अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे. गंभीर बाब म्हणजे २०१८ मध्ये नराधम निवृत्ती काळभोरविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याने शाळेतील मुलीचा विनयभंग केला होता. न्यायालयाने त्याला शिक्षा देखील सुनावली होती. तरीदेखील या पी.टी. शिक्षकाला कीर्ती विद्यालयाने पुन्हा नोकरीवर रुजू केले. याप्रकरणी मुख्याध्यापकासह ट्रस्टीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अॅट्रॉसिटीसह बाल लैंगिक अत्याचाराचे कलम लावले आहेत.
या प्रकरणी कीर्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक जाधव, ली. सोफिया एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास बलभीम जाधव, लक्ष्मण नामदेव हेंद्र, अरविंद अंकुश निकम, गोरख सोपान जाधव, हनुमंत दादा निकम आणि शुभांगी अशोक जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा…पिंपरी: निळ्या पूररेषेतील बांधकामांचे सर्वेक्षण; पोलीस बंदोबस्तात होणार कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूरच्या घटनेनंतर पीडित बारा वर्षीय मुलीने २०२१ ते २०२४ दरम्यान घडलेल्या प्रकाराची माहिती वर्गशिक्षकाला दिली. वर्गशिक्षकाने मुख्याध्यापकांना ही गंभीर बाब सांगितली. नंतर हे प्रकरण निगडी पोलीस ठाण्यात पोहोचले. डीसीपी स्वप्ना गोरे यांनी अत्यंत जबाबदारीने हे प्रकरण हाताळत संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. २०२१ ते २१ ऑगस्ट २०२४ दरम्यान पीडित मुलीला आरोपी निवृत्ती काळभोर जाणीवपूर्वक बॅड टच करायचा, तिचा वॉशरूमला जाताना पाठलाग करायचा. पी.टीच्या क्लासला ग्राउंड वर जाताना पीडितेच्या कंबरेला, पाठीवर हात फिरवत असायचा. अनेकदा त्याने अल्पवयीन मुलीच्या अंतर्वस्त्रात हात देखील घातल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. हे सर्व अल्पवयीन मुलगी चार वर्षे झालं सहन करत होती. ती कुणालाही काहीही बोलली नाही.
हे सर्व घडण्याआधी २०१८ मध्ये याच ५६ वर्षीय नराधम निवृत्ती काळभोरने शाळेतील अल्पवयीन मुलीची छेड काढली होती. त्याबाबत निगडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करून संबंधित कीर्ती विद्यालयाने आरोपीला प्रोत्साहन देत पुन्हा शाळेत रुजू केले. बदलापूरच्या घटनेनंतर महाराष्ट्रात अत्याचाराविरोधात उसळलेली लाट पाहून बारा वर्षीय पीडित मुलीने मोठ्या हिमतीने वर्गशिक्षकाला चार वर्षे घडत असलेला सर्व प्रकार सांगितला आणि घटनेला वाचा फुटली. निगडी पोलिसांनी देखील हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने हाताळत शाळेतील गुन्हेगाराला प्रोत्साहन देणाऱ्या मुख्याध्यापकासह ट्रस्टीवर गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.