पुण्यात बसचे ब्रेक निकामी होऊन अपघात झाल्याची घटना ताजी असताना सोमवारी संध्याकाळी पिंपरी चिंचवड मधील पिंपळे गुरव बस स्थानकात आश्चर्यचकित करणारी घटना घडली. चालक-वाहकाविना उभी असलेली बस अचानक सुरू होऊन ९० मीटर अंतरावरील गॅरेजमध्ये शिरली. विशेष म्हणजे यावेळी रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहतूक सुरू होती. पण या घटनेत कोणी जखमी झाले नाही. बसचे व गॅरेजचे नुकसान झाले आहे. पाच मिनिटांच्या या घटनेमुळे मात्र यावेळी रस्त्यावर असलेल्यांची गाळण उडाली होती. चालकाविना ही बस धावलीच कशी याची चर्चा सध्या पिंपळे गुरवमध्ये रंगली आहे. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
पुण्यातील मार्केट यार्डवरून बस (एमएच १४ सीडब्ल्यू १७०९) पिंपळे गुरव येथील बस स्थानकात आली. चालक युवराज चंद्रकांत कुदळे (वय ४२, रा. हिवरे, ता.पुरंदर, जि. पुणे) आणि वाहक नोंद करण्यासाठी गेले असता. अचानक उभी असलेली बस रस्त्यावरून निघाली. बसमध्ये चालक व वाहक कोणीच नव्हते. त्यावेळी परिसरात वर्दळ होती. बस हाकेच्या अंतरावर असलेल्या गॅरेजमध्ये घुसली. या अपघातात कुणी जखमी झाले नाही. पण बसच्या समोरील बाजूचे व गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले. आहे. चालकाने बसला हँडब्रेक लावल्याचा दावा केला आहे. ही सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार केंद्रे करत आहेत.