पिंपरी-चिंचवड: पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदारांना मंत्री पदाचे वेध लागले आहेत. आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप आणि आमदार अण्णा बनसोडे हे मंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. तिन्ही विधानसभा मतदारसंघातून कुठला आमदार मंत्रीपद खेचून आणतो यावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. आमदार अण्णा बनसोडे यांनी अजित पवारांकडे मंत्रिपदाची मागणी केलेली आहे. चिंचवड मधून शंकर जगताप हे मंत्रीपदासाठी अनुकूल आहेत. आमदार महेश लांडगे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत असून गेल्या वेळेस त्यांचं मंत्री पद थोडक्यात हुकल होतं. यामुळे पिंपरी- चिंचवड शहरात कुणाला मंत्रीपद मिळते हे पाहावं लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधासभेत महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. पैकी, दोन आमदार हे भाजपचे आहेत. एक आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत. जनतेने मोठ्या मताधिक्याने उमेदवारांना विजयी केलं आहे. महाराष्ट्रात महायुतीची एक हाती सत्ता आली आहे. सत्तास्थापनेच्या आधीच पिंपरी- चिंचवड शहरात मंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदार अण्णा बनसोडे यांनी निकालाच्या दिवशी अजित पवार मला मंत्री पद देतील असा विश्वास व्यक्त केला आहे. आमदार शंकर जगताप यांनी देखील मंत्री पदाबाबत सकारात्मक आहेत. पिंपरी- चिंचवड शहरात मंत्रिपद मिळालं तर आनंद आहे. मला मिळो किंवा दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला, अशी प्रतिक्रिया जगताप यांनी दिली होती. भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश लांडगे यांचं गेल्या वेळी थोडक्यात मंत्री पद हुकलं हे सर्वश्रुत आहे. त्यांनी देखील यावेळी जोर लावल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा : Chinchwad and Maval Vidhan Sabha : चर्चा तर होणारच; भाजपचे शंकर जगताप १ लाख, तर सुनील शेळके १ लाख ८ हजारांच्या मताधिक्याने विजयी

सत्ता स्थापनेच्या आधीच तिन्ही मतदारसंघातून आपल्या आमदाराला मंत्री पद मिळावं म्हणून लॉबिंग केली जात आहे. शहरात लावण्यात आलेल्या फलकांवर मंत्री पदाचा उल्लेख आहे. विधानसभा एकत्र लढून उमेदवार जिंकले असले तरी मंत्री पदावरून महायुतीत उभी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री पद एक आणि दावेदार तीन अशी अवस्था सध्या पिंपरी- चिंचवड शहरात झाली आहे. तिन्ही आमदार आपापल्या वरिष्ठ नेत्यांकडे गाऱ्हाणे मांडत आहेत. पण, खऱ्या अर्थाने मंत्रीपद कुणाला मिळतं हे पाहणं महत्वाचं आहे. ज्या आमदाराला मंत्री पद मिळेल तो शहराचा कारभार पाहिल अशी जोरदार चर्चा आहे. तिन्ही आमदार मंत्री पद मिळवण्यासाठी ताकद लावत आहेत. कुठल्या आमदाराला मंत्री पद मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad vidhan sabha result mla mahesh landge mla shankar jagtap mla anna bansode trying hard to get ministry kjp 91 css