पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याचा महापौरांचा दावा
पिंपरी-चिंचवड शहरात पाणीकपात करायची की नाही, याविषयावर निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात येणारी व यापूर्वी दोन वेळा रद्द झालेली सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक अखेर मंगळवारी (२८ नोव्हेंबर) अवघ्या दहा मिनिटांमध्ये उरकण्यात आली. जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मांडलेला पाणीकपातीचा प्रस्ताव फेटाळत महापौर राहुल जाधव बैठकीतून निघून गेले.
महापौरांच्या अध्यक्षतेखाली तसेच आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीस सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे आदी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी उपलब्ध पाणीसाठय़ाची माहिती दिली. त्यानंतर, पाणीकपातीची गरज व्यक्त करत पाणीपुरवठा विभागाचे नियोजनही सांगितले. आयुक्तांनी चक्री पाणीकपात करण्याची सूचना केली. महापौरांनी तूर्त पाणीकपातीची गरज नसल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. बैठकीत वेगवेगळ्या पर्यायांवर चर्चा सुरू असताना पाणीकपातीची गरज नसल्याचे सांगत महापौर बैठकीतून निघून गेले. त्यानंतर, पक्षनेत्यांनी पाणीपुरवठा विभागाने ठोस प्रस्ताव घेऊन लोकप्रतिनिधींसमोर यावे, अशी सूचना केली. त्यानंतर, बैठक उरकण्यात आली.
पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणीकपात करण्याची सूचना जलसंपदा विभागाने पालिकेला केली. मात्र, पिंपरी -चिंचवडमध्ये पाणीकपात करण्यास लोकप्रतिनिधींचा सुरूवातीपासून विरोध होता. त्यामुळेच पाणीकपातीचे धोरण ठरत नव्हते. पाणीकपातीचा निर्णय घेण्यासाठी आयोजित बैठकही दोन वेळा रद्द करण्यात आली होती. मंगळवारी झालेल्या बैठकीत आधीच ठरलेला पाणीकपात न करण्याचा निर्णय महापौरांनी जाहीर केला.
पवना धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा आहे. ३० जूनपर्यंत सध्याचे पाणी पुरणार आहे. त्यामुळे आतापासूनच पाणीकपात करण्याची गरज नाही. पाण्याचा जपून वापर करण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या जातील.
– राहुल जाधव, महापौर, पिंपरी-चिंचवड