पिंपरी चिंचवड शहरात दोन मे पासून पालिकेने पाणी कपात धोरण अवलंबले आहे. त्यामुळे याठिकाणी दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. पाण्याच्या कपातीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असताना पिंपळे गुरव येथील जलवाहिनी अचानक फुटल्याने पाणी संकटात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. सोमवारी पिंपळे गुरवमधील जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. शहरात आणि राज्यात तापमानाने उच्चांक गाठला असल्यामुळे जलवाहिनी फुटलेल्या परिसरातील नागरिकांना थंडा थंडा कूल कूल अनुभव मिळाला असला तरी पाणी टंचाईच्या काळात घडलेली ही घटना भविष्यात नागरिकांची पाण्याची समस्या अाणखी वाढविणारी ठरु शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरवभागात सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास महाराष्ट्र बँकेच्यासमोर पिंपळे गुरव ते दापोडीच्या दिशेने जमिनीखालून जाणारी जलवाहिनी अचानक फुटली. ही जलवाहिनी फुटल्यानंतर मोठ्या प्रवाहाने पाणी वाहत होते. रस्त्यालगत आणि बाजूच्या दोन गल्लीत मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे याच महिन्यात दोन मे पासून दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय महानगर पालिकेच्यावतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याच्या टंचाईचा सामना करत असणाऱ्या  पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांच्या समस्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी पाणी कपात करण्याच्या निर्णय घेतल्यानंतर पालिकेने पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केल्याचे समोर आले होते.  रविवारी पालिकेच्या मुख्य इमारतीतील भिंती आणि जिना धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. त्यात आता जलवाहिनी फुटल्यामुळे आणखी भर पडली आहे. अधिक दाबाने पाणी सोडल्यामुळे ही जलवाहिनी फुटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad water supply pipe damage in piple gurav