लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी : शहर खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेतर्फे स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या आधारे सद्य:स्थितीतील रस्त्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. रस्त्यांच्या स्थितीचे मूल्यांकन, खड्डे असलेला परिसर ओळखण्यासाठी आणि आवश्यक दुरुस्तीला प्राधान्य देण्यासाठी सर्वेक्षण उपयुक्त ठरेल, असा विश्वास आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला. सर्वेक्षणानंतर रस्त्यांची गुणवत्ता, देखभालीसाठी कंत्राटदार, संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात १७०० किलोमीटर लांबीचे काँक्रीट आणि डांबरी रस्ते आहेत. या रस्त्यांची प्रत्यक्ष तपासणी आणि संरचनात्मक मूल्यांकनांद्वारे खड्डे दुरुस्ती कामांच्या गुणवत्तावाढीला प्राधान्य दिले जाणार आहे. रस्त्यांना भेगा, खड्डे पडणे आणि रस्ता खचणे या समस्यांची प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संरचनात्मक मूल्यांकन केले जाणार आहे. रस्त्यांबाबत संकलित केलेली माहिती महापालिका भौगोलिक माहिती प्रणालीवर (जीआयएस) अद्ययावत करणार आहे. त्या आधारे खड्डेदुरुस्तीवर लक्ष ठेवण्यासाठी उपयोजन तयार केले जाणार आहे. यामुळे एकाच ठिकाणी सतत पडणारे खड्डे टाळणे, रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.

आणखी वाचा-पिंपरी : ‘लेझर बीम’चा वापर टाळा; पोलीस आयुक्तांचे आवाहन

याबाबत माहिती देताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, की स्वयंचलित तंत्रज्ञान आणि ‘जीआयएस’ प्रणालीच्या आधारे रस्त्यांच्या समस्या तत्काळ सोडविण्यास मदत होईल. तसेच अर्थसंकल्पातील नियोजन आणि रस्तेबांधणीच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यास मदत मिळणार आहे.

शहरात ५१५१ खड्डे

शहरातील रस्त्यांवर यंदा सर्वाधिक खड्डे पडले होते. एक जूनपासून ५१५१ खड्डे आढळले होते. त्यांपैकी ४४८७ खड्डे बुजविले आहेत. ६६४ खड्डे बुजविणे बाकी आहेत. मागील आठवड्यात ६६३ खड्डे आढळून आले आहेत.

सर्वेक्षणात प्रत्येक रस्त्यावरील दहा मीटर अंतराचे छायाचित्र काढण्यात येणार आहे. त्याद्वारे खड्डा, पदपथांची स्थिती समजणार आहे. त्यानंतर महापालिका खड्डे बुजविणार आहे. वर्षभरात पुन्हा त्याच जागेवर खड्डा पडला, तर ठेकेदाराकडून खड्डा बुजवून घेतला जाणार असल्याचे उपअभियंता अश्लेष चव्हाण यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad will be pothole free what decision did municipal corporation take pune print news ggy 03 mrj