पिंपरी : भूमी अभिलेख कार्यालयातील कामांसाठी पिंपरी-चिंचवडकरांची हवेली कार्यालयात होणारी पायपीट थांबविण्यासाठी महापालिका हद्दीतील गावांचा समावेश हवेली कार्यालयाऐवजी पिंपरी-चिंचवड भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत करावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली. त्यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रस्ताव पाठविण्याची सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.
भूमी अभिलेख कार्यालयातून शेत जमिनीची मोजणी, जमिनीचे नकाशे, भू-संपादनाची मोजणी, न्यायालयातून आलेल्या प्रकरणाचे निर्गतीकरण करणे, न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीच्या मोजणी, खरेदी विक्री, वारसा वाटणी नोंदी आदींसह त्या संदर्भातील दाखले, नमुने देण्याचे काम केले जाते. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील काही गावांचा समावेश हवेली भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत येतो. त्यामुळे नागरिकांना पुणे येथील कार्यालयात आपल्या कामांसाठी जावे लागते. यामध्ये वेळ आणि पैसा खर्च होत होत आहे.
हेही वाचा >>> पिंपरी : निगडीतील भुयारी मार्गाचे काम संपेना
पूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील काही गावांचा हवेली तहसील कार्यालय अंतर्गत समावेश होता. ती गावे पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयाअंतर्गत संलग्नीत करण्यात आलेली आहेत. त्यामुळे तहसीलशी संबंधित कामांची होणारी नागरिकांची गैरसोय टळली आहे. त्याच धर्तीवर भूमी अभिलेख हवेली कार्यालयातील काही गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आहेत. ही गावे भूमी अभिलेख कार्यालय पिंपरी- चिंचवड या कार्यालयाशी संलग्न करावीत. जेणेकरुन नागरिकांना जमीन मोजणीकरिता तसेच प्रॉपर्टी कार्डच्या कामासाठी हवेली भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जाण्याची भौगोलिकदृष्ट्या गैरसोय टळेल, असेही आमदार लांडगे म्हणाले.
शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखाच्या घरात आहे. पूर्वी हवेली भूमी अभिलेख कार्यालयाचे क्षेत्र लोकसंख्या कमी असल्याने सोयीचे होते. मात्र, आता पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांना भूमी अभिलेख संदर्भातील कामांसाठी पुण्यात जावे लागते. – महेश लांडगे, आमदार