सत्ता असून कामे होत नाहीत, जिथे-तिथे राष्ट्रवादीच्या ‘दादा’ गिरीचा प्रत्यय येतो. मुख्यमंत्री पुण्यात येतात, मात्र, पिंपरीत येत नाहीत. राज्यात सर्वप्रथम सुरू केलेल्या जनजागरण यात्रेच्या समारोपाला ते वेळ देत नाहीत. नगरसेवकांचे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत, शहर काँग्रेसशी तसेच नगरविकास खात्याशी संबंधित प्रश्न आहेत, त्याच्या बैठकांसाठी वेळ मिळत नाही, पक्षात ताकद मिळत नाही, पदांचे वाटप होत नाही, साध्या-साध्या गोष्टी मार्गी लागत नाहीत, अशा तक्रारींचा पाढा िपपरी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निरीक्षकांसमोर मांडला आणि अवाक् होण्याची वेळ त्यांच्यावर आली.
नेहरुनगरच्या साई सभागृहात काँग्रेसच्या निरीक्षक व माजी मंत्री शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची आढावा बैठक झाली, त्यास शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते विनोद नढे, महिला अध्यक्षा ज्योती भारती, सचीव सचिन साठे, माजी महापौर हनुमंत भोसले, बाबा तापकीर आदींसह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. शहराध्यक्षांनी आपल्या तीव्र भावना निरीक्षकांसमोर मांडल्या. मुख्यमंत्री पिंपरीत न येण्याचे कारण पत्रकार विचारतात, खरे सांगता येत नाही, खोटे सांगून वेळ मारून न्यावी लागते. पुण्याला व िपपरीला वेगवेगळा न्याय द्यायचा असल्यास पिंपरीची काँग्रेस पुण्यात विलीन करा, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू, भोईरांच्या आक्रमक विधानांमुळे निरीक्षक अवाक् झाल्या. सारवासारव करत कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू, त्यांच्या उपस्थितीत बैठका व पक्षाचे कार्यक्रम लावू, अशी ग्वाही त्यांनी दिली. विनोद नढे, सचिन साठे, राजू गोलांडे, सुदाम ढोरे, संदेश नवले यांनी मनोगते व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या दादागिरीचा उल्लेख करतानाच काँग्रेस नेतृत्वाच्या थंड धोरणाविषयीच्या नाराजीचा सूर त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांना कामे करताना अडचणी येतात. मात्र, त्या सोडवण्याची सक्षम यंत्रणा पक्षाकडे नाही. पदांचे वाटप होत नाही, नावाला शिक्क्य़ापुरतेही पद नाही. राष्ट्रवादी गुलामगिरीची वागणूक देते. पक्षाच्या नुसत्याच बैठका होतात, निर्णय होत नाही. एकतरी विषय मार्गी लागल्याचे उदाहरण नाही. अशा परिस्थितीत काम कसे करायचे, असा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.