पक्षश्रेष्ठींकडून पिंपरी काँग्रेस वाऱ्यावर; कुणी नेता मिळेल का, कार्यकर्त्यांची भावना
अनेक वर्षे पिंपरी पालिका ज्या काँग्रेस पक्षाच्या ताब्यात होती, त्या एकेकाळी सक्षम असणाऱ्या काँग्रेसपुढे आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेसचे मूठभर कार्यकर्ते शहरात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्यासाठी धडपडत आहेत. त्याचे पक्षश्रेष्ठींना फारसे सोयरसुतक नसल्याचे दिसते. पक्षनेतृत्वाने वाऱ्यावर सोडले असल्याची भावना व्यक्त करत आंदोलनांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा हा एकाकी लढा सुरू आहे.
पिंपरी पालिकेच्या स्थापनेपासून शहरात काँग्रेसचा वरचष्मा होता. सुरुवातीपासून काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा प्रा. रामकृष्ण मोरे यांच्याकडे होती. बरीच वर्षे ते सक्षमपणे कारभार हाताळत होते. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, त्यानंतर राष्ट्रवादीचा प्रभाव वाढला आणि हळूहळू काँग्रेसची ताकद कमी होत गेली. तरीही २००२च्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बरोबरीने काँग्रेसने जागा जिंकल्या. त्यानंतर मोरे यांचे निधन झाले आणि काँग्रेसची अवस्था पोरकी झाली. पुन्हा तसे नेतृत्व शहर काँग्रेसला मिळू शकले नाही. माजी खासदार सुरेश कलमाडी व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नेतृत्वाचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश मिळू शकले नाही. हनुमंत गावडे, श्रीरंग बारणे, गौतम चाबुकस्वार, भाऊसाहेब भोईर असे ताकदीचे अनेक मोहरे काँग्रेस सोडून गेले. बारणे व चाबुकस्वार यांनी शिवसेनेची साथ केली. पुढे ते खासदार व आमदार झाले. तर, गावडे, भोईर राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यांना पक्षाने स्वीकृत नगरसेवक केले. त्यानंतर सचिन साठे यांच्याकडे शहर काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा आली, मात्र तोपर्यंत पक्षाची पुरती वाताहत झाली होती. प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करत विविध आंदोलने करत साठे यांनी पक्षाचे नाव चर्चेत ठेवले आहे. आधी राष्ट्रवादीच्या विरोधात आणि आता भाजपच्या विरोधात त्यांचा लढा सुरू आहे. मात्र नेत्यांचे लक्ष नाही. कार्यकर्त्यांना ताकद मिळत नाही. पक्षाकडून निधी उपलब्ध होत नाही. मोठे नेते शहराकडे फिरकत नाहीत. त्यांच्याकडे कामे घेऊन गेल्यानंतर ती होत नाहीत, अशा अनेक तक्रारी कार्यकर्ते करत आहेत. पक्षश्रेष्ठींनी वाऱ्यावर सोडल्याने पालिका निवडणुकीत पक्षाची धूळधाण उडाली. काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही, शहराध्यक्षही पराभूत झाले. त्यानंतरही पक्ष सावरण्यासाठी नेतृत्वाकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. ज्या पिंपरी-चिंचवडची सत्ता अनेक वर्षे काँग्रेसच्या ताब्यात होती, तिथे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता पिंपरीत आली. तगडय़ा भाजपशी लढण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही. प्रतिकूल परिस्थिती असतानाही कार्यकर्ते लढण्यास तयार आहेत, मात्र पक्षनेतृत्वाकडून रसद मिळत नसल्याने कार्यकर्ते हतबल आहेत. काँग्रेसला अपंगत्व आले असून कुणी नेता मिळेल का आणि कुणी आमच्याकडे लक्ष देईल का, असा प्रश्न कार्यकर्ते विचारताना दिसत आहेत.