पिंपरी : आगामी पिंपरी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने विभागीय मेळावे सुरू केले असून त्याद्वारे शहरातील नागरी प्रश्नांवरून भाजपला लक्ष्य केले आहे. पाणीपुरवठा, रेडझोन, खंडित विजपुरवठा, लघुउद्योगांच्या समस्या आदी मुद्द्यांवर राष्ट्रवादीने भाजपवर हल्लाबोल केला आहे.
पिंपरी-चिंचवडकरांवर गेल्या तीन वर्षांपासून सक्तीने पाणीकपात लादण्यात आली असून, दिवसाआड पाणी हे भाजपचे पाप आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे. धरणात पुरेसा पाण्याचा साठा व शहरात नियमितपणे मुबलक पाऊस पडत असतानाही पाणीकपात करणे दुर्दैवी आहे. नागरिकांच्या हक्काचे पाणी पळवण्यात आल्याचा आरोप गव्हाणे यांनी केला.
हेही वाचा >>> नवीन अभ्यासक्रमात महापुरुषांची चरित्रे; चंद्रकांत पाटील यांची घोषणा
पिंपरी-चिंचवडसह चाकण परिसरातील लघुउद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेली बैठक निव्वळ फार्स असून लघुउद्योजकांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. त्यांच्या समस्यांकडे आतापर्यंत दुर्लक्ष करणाऱ्या भाजपला पालिकेच्या निवडणुका तोंडावर लघुउद्योजकांचा पुळका आला आहे. रेडझोन, शास्तीकराचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन भाजपने दिले. केंद्रात व राज्यात त्यांच्याच पक्षाचे सरकार असतानाही शहरवासीयांचे प्रश्न सोडविण्यात त्यांना अपयश आले आहे. आतापर्यंत शास्तीकरावर गळा काढणारे भाजप नेते आता शास्तीकरावर काहीच बोलायला तयार नाहीत, याकडे गव्हाणे यांनी लक्ष वेधले आहे.