महापालिकेला रस्त्यासाठी दिलेल्या जागेचा मोबदला न दिल्याने भोसरीतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पंडित गवळी यांनी रस्ता अडवून नागरिकांना वेठीस धरले आहे. अनधिकृत शेड पाडल्याचा राग धरून झाडे तोडल्याचा कांगावा त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केला. तथापि, गवळी धडधडीत खोटे बोलत असल्याचा खुलासा आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
गवळी हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक असून अजितदादांचे निकटवर्तीय आहेत. गवळी यांच्या अनधिकृत मंगल कार्यालयाचे शेड पाडण्यात आले. त्यावरून त्यांनी जागेच्या मोबदल्याचा विषय उकरून काढला व पुढे बरेच रामायण घडले. गवळी परिवाराने भोसरीत महापालिकेच्या विकासकामांसाठी जागा दिलेल्या आहेत. मात्र, त्याचा मोबदला त्यांना मिळालेला नाही. यावरून त्यांचा महापालिकेशी सातत्याने वाद सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही परिस्थिती आहे. अशात, गवळींच्या अनधिकृत मंगल कार्यालयाचे शेड पालिकेने पाडले. त्यामुळे संतापलेल्या गवळींनी स्वत:च्या जागेतून जाणारा व मोबदला न मिळालेला रस्ता भिंत बांधून व मोठे दगड आडवे टाकून बंद केला. त्याचवेळी त्यांनी पालिकेची ड्रेनेज पाईपलाईन फोडल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. शनिवारी हा प्रकार घडला व रविवारी अजितदादा शहरात होते. शेड पाडताना अधिकाऱ्यांनी आपण महाबळेश्वरून आणलेली झाडेही तोडली, अशी तक्रार त्यांनी केली. त्यावरून अजित पवार यांनी आयुक्तांसमक्ष अधिकाऱ्यांवर आगपाखड केली.
दरम्यान, झाडे तोडल्याची तक्रार करताना गवळी धडधडीत खोटे बोलले होते. त्यामुळेच अजितदादांच्या तीव्र रोषास सामोरे जावे लागल्याचे स्पष्टीकरण आयुक्तांनी केले. त्या ठिकाणी वृक्षतोड झाली नाही. ज्या जागेचा मोबदला गवळी मागत आहेत, ती जागा रेडझोनच्या हद्दीत आहे. त्यामुळे पालिका मोबदला अथवा टीडीआर देऊ शकत नाही, असे स्पष्ट करत ड्रेनेजचे चेंबर फोडल्याप्रकरणी गवळींना नोटीस बजावण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.
रस्त्याचा मोबदला न मिळाल्याने गवळी यांच्याकडून अडवणूक अजितदादांकडे खोटाच कांगावा- आयुक्त
महापालिकेला रस्त्यासाठी दिलेल्या जागेचा मोबदला न दिल्याने भोसरीतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पंडित गवळी यांनी रस्ता अडवून नागरिकांना वेठीस धरले आहे.

First published on: 14-06-2013 at 02:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri commissioners explanation about obstruction of pandit gawali