महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये खांदेपालट झाल्यानंतर माणिकरावांच्या जागी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आली आहे. माणिकरावांना बऱ्याच कालावधीत न सुटलेला पिंपरी शहर काँग्रेसचा तिढा या वादाबाबतची सविस्तर माहिती असलेल्या अशोकरावांच्या कोर्टात आला आहे.
शहराध्यक्ष सचिन साठे आणि माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यातील संघर्षांमुळे शहर काँग्रेसची पुरती बदनामी होत असल्याची भावना सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे. पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत असलेल्या भोईरांचे शिवसेना, भाजप तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांशी गुफ्तगू सुरू आहे. मात्र, आपण पक्षातच राहणार असल्याचे विधान ते वारंवार करत आहेत. नगरसेवकपदाला बाधा येऊ नये म्हणून ते पक्षात थांबल्याचा कार्यकर्त्यांमधील चर्चेचा सूर आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षनेतेपद भूषवलेल्या कैलास कदम यांनाच पुन्हा संधी देण्याचा आग्रह धरून साठे उगीचच प्रतिष्ठा पणाला लावल्याचे त्यांच्या समर्थकांचेही म्हणणे आहे. मुळात काँग्रेसची अवस्था दयनीय तसेच आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षसंघटना मजबूत करणे आवश्यक असताना एकमेकांशी लढण्यात हे नेते शक्ती खर्च करत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. माणिकरावांना दोन्ही गटातील वादाची पूर्णपणे माहिती होती. तथापि, त्यांच्यातील वाद मिटवण्यात त्यांना यश आले नाही. आता अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. त्यांना साठे-भोईर वादाची तसेच पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाची पुरेपूर कल्पना आहे. त्यामुळे याबाबत ते कोणता दृष्टिकोन ठेवतात, यावर शहर काँग्रेसची पुढील समीकरणे ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri congress ashok chavan