सत्ता असूनही कामे होत नाहीत, पदे मिळत नाहीत, यांसारख्या तक्रारी करून काँग्रेस कार्यकर्ते दमले, तरी त्याकडे लक्ष दिले गेले नाही. अशा तक्रारी वाढल्यानंतर त्याची दखल घेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील महामंडळांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्तया करण्याचे आदेश मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांना दिले, अशी माहितीपर घोषणा राहुल यांचे निकटवर्तीय व पक्षाचे सहप्रभारी श्योराज वाल्मीकी यांनी केली. तथापि, त्या घोषणेला केराची टोपली दाखवण्यात आली. लोकसभा निवडणुकीत पक्षाची दाणादाण उडाली. मात्र, पक्ष कारभारात सुधारणा झाली नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.
पिंपरी शहर काँग्रेसच्या वतीने गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबरला काळेवाडीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, तेथे भाषण करताना श्योराज वाल्मीकी यांनी राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील कार्यकर्त्यांना दिला होता. आपण राज्यभर फिरतो. कार्यकर्त्यांची मोठी फळी नाराज आहे. सत्ता असून कामे होत नाहीत. काम करूनही पदे मिळत नाही, अशी कार्यकर्त्यांची खंत आहे, अशी माहिती आपण राहुल गांधी यांच्या कानावर घातली. तेव्हा २० नोव्हेंबपर्यंत महामंडळे व अन्य समित्यांवर नियुक्तया करण्याची सूचना राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना दिल्याचे वाल्मीकी यांनी सांगितले.
त्यानुसार, इच्छुकांचे २० नोव्हेंबरकडे लक्ष होते. प्रत्यक्षात, त्या तारखेपर्यंत व त्यानंतरही काहीच झाले नाही. बऱ्याच नाटय़मय घडामोडीनंतर रखडलेली रिक्त मंत्रिपदे नुकतीच भरण्यात आली. राज्यपालनियुक्त वर्णी लागावी, यासाठी अनेकांची मोर्चेबांधणी सुरू आहे. आता महामंडळाची यादीही तयार होईल, या आशेवर कार्यकर्ते आहेत. अनेकांनी मुंबई-पुणे वाऱ्या सुरू केल्या आहेत. पिंपरीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाणारे प्राधिकरणाचे अध्यक्षपद व अन्य तीन सदस्यपदावर संधी मिळण्यासाठी स्थानिक नेत्यांमध्ये चढाओढ आहे. अध्यक्षपदासाठी तर कोटय़वधींची बोली लावली जात आहे. कोणाची लॉटरी लागते, याची सर्वानाच प्रतीक्षा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा