पिंपरी पालिकेच्या वतीने शालेय शिक्षणासाठी कोटय़वधी रूपये खर्च करून विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा दिल्या जातात. मात्र, तरीही पालिका शाळेतील शिक्षणाच्या दर्जावरून नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येते. दर्जासह अनेक कारणामुळे पालिकेच्या शिक्षण विभागाला घरघर लागल्याचे चित्र प्रकर्षांने दिसून येते. त्यामुळे महापालिका शाळांची, त्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची व त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचीही संख्या वर्षांगणिक कमी होत चालली आहे.
महापालिकेच्या सद्य:स्थिती पर्यावरण अहवालात २०१३-१४ आणि २०१४-१५ या दोन वर्षांतील सविस्तर आकडेवारी मांडण्यात आली आहे. त्यातून पालिकेच्या शिक्षण विभागाची सद्य:स्थिती स्पष्ट होते. महापालिकेच्या १३१ प्राथमिक शाळा आहेत, त्यामध्ये जवळपास ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी १२२० शिक्षक कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे, १८ माध्यमिक शाळा असून त्यामध्ये ८२४१ विद्यार्थी आहेत व त्यांच्यासाठी २४२ शिक्षक उपलब्ध आहेत. शाळांची संख्या पाहता २०१३-१४ मध्ये शहरात ११९ मराठी शाळा होत्या, त्यानंतरच्या वर्षांत ती संख्या ११४ पर्यंत खालावली. २०१३-२०१४ मध्ये ३६ हजार १७४ विद्यार्थी होते, त्यानंतरच्या वर्षांत ३५ हजार ०७४ विद्यार्थी राहिले. शिक्षकांच्या संख्येतील घटही प्रकर्षांने दिसून येते. पहिल्या वर्षी ११३६, तर दुसऱ्या वर्षांतील शिक्षकसंख्या एक हजार ९५ होती. शाळा, विद्यार्थी तसेच शिक्षकांच्या संख्येतील हीच घसरण यंदाच्या वर्षीही चालू असल्याचे सांगण्यात येते. या तुलनेत हिंदूी, इंग्रजी, उर्दू शाळांची संख्या ‘जैसे थे’ आहे. माध्यमिक शाळांची संख्या दोन्ही वर्षांत १७ इतकीच राहिली असली तरी विद्यार्थी संख्येत मात्र दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची घट झाली आहे, तीच स्थिती शिक्षक संख्येतही आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या संख्येच्या तुलनेत शौचालयांची संख्याही कमीच असल्याचे दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा