चिंचवडचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांचा खून झाला आणि गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेले नगरसेवक, शहरातील वाढत चाललेली गुन्हेगारी, पोलिसांचे अर्थपूर्ण लागेबांधे असे सगळे विषय पुन्हा ऐरणीवर आले. गुन्हेगारांना मिळणारे राजकीय संरक्षण, पोलीस व गुन्हेगारांमधील साटेलोटे आणि गुन्हेगारांना नसलेली पोलिसांची भीती हे अशा घटनांच्या मुळाशी आहे. आजही पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे अनेक नगरसेवक आहेत आणि त्यांचे पूर्वीचे ‘उद्योग’ सुरूच आहेत. पोलीस, राजकारणी आणि गुन्हेगारांच्या अभद्र युतीमुळे शहरातील वातावरण कमालीचे गढूळ झाले आहे.
अविनाश टेकवडे यांच्यावर दोन वर्षांपूर्वी खुनी हल्ला झाला होता. मात्र, तो पिस्तूल परवान्यासाठी त्यांनीच केलेला बनाव असावा, अशी शंका व्यक्त करत पोलिसांनी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. राहत्या घराजवळ तशाच पध्दतीने हल्ला करून त्यांचा खून झाला. माथाडी नेता प्रकाश चव्हाण याच्यावर काही महिन्यांपूर्वी निगडीत हल्ला झाला होता, नंतर भर गर्दीच्या ठिकाणी त्याचाही खून झाला. यापूर्वी, नगरसेवक संजय काळे, अनिल हेगडे आणि भाजपचे तत्कालीन शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे खून झाले आहेत. जिथे नगरसेवकच सुरक्षित नाहीत, तेथे सामान्यांच्या सुरक्षिततेचे काय! आजही शहरातील गुन्हेगारी वास्तव चिंताजनक आहे. जवळपास २० नगरसेवकांची पाश्र्वभूमी गुन्हेगारीची आहे. काहींचे तडीपारीचे प्रस्ताव तयार होऊन रद्द झाले. पूर्वी केलेले ‘उद्योग’ पदावर आल्यावर कमी न होता वाढले आहेत. काही वर्षांपूर्वी एकाने वाढदिवसाच्या पार्टीत गम्मत म्हणून हवेत गोळीबार केला होता. बोभाटा झाल्यानंतर ड्रायव्हरला हजर करून त्याने स्वत:ची सुटका करून घेतली. अनेक नगरसेवकांच्या कमरेला पिस्तूल दिसते, महिला लोकप्रतिनिधींच्या पर्समध्ये पिस्तूल असते. अनेकांच्या सोबत कार्यकर्ते म्हणून सराईत गुन्हेगार उजळमाथ्याने मिरवत असतात. शहराचे नेते म्हणून घेणारे स्वत:बरोबर गुन्हेगारांना घेऊन फिरण्यात धन्यता मानतात. कोणी किती गुन्हेगार पोसले आहेत, यावर ‘वर्चस्वा’चे गणित मांडले जाते. फ्लेक्सबाजी करून गुन्हेगारांचे उदात्तीकरण केले जाते, त्याकडे डोळेझाक केली जाते. पोलिसांना ही परिस्थिती माहिती आहे. बरेच अधिकारी जमिनीच्या दलालीत गुंतलेत. काही राजकीय नेत्यांच्या हुजरेगिरीत अडकले आहेत. राजकीय दबाव तसेच अर्थकारणामुळे ते कारवाई करण्याच्या भानगडीत पडत नाहीत.
– पिंपरीत पोलीस, राजकारणी आणि गुन्हेगारांची अभद्र युती
अनेक नगरसेवकांच्या कमरेला पिस्तूल दिसते, महिला लोकप्रतिनिधींच्या पर्समध्ये पिस्तूल असते.
Written by दिवाकर भावे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-09-2015 at 03:13 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri corporators with pistol