वारेमाप खर्च आणि किरकोळ उत्पन्न, अशी परिस्थिती असल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील नाट्यगृहे चालवताना महापालिकेची दमछाक होत असल्याने टप्प्याटप्प्याने नाट्यगृहांचे खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर खासगी संस्थेला सशर्त चालवण्यासाठी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. १ ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी हे नाट्यगृह संबंधित संस्थेकडे दिले जाणार आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, पिंपरी-संततुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर, भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह आणि सांगवीतील निळूभाऊ फुले नाट्यमंदिर ही महापालिकेची चार नाट्यगृहे आहेत. याशिवाय, आकुर्डी प्राधिकरणातील पाचवे ‘ग.दि.मा. नाट्यगृह’ लवकरच प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे.
सुरुवातीला सहा महिने प्रायोगिक तत्त्वावर सशर्त हे नाट्यगृह दिले जाणार –
नाट्यगृहांच्या उभारणीपासून ते दैनंदिन देखभालीसाठी तसेच तेथील वीज देयकांसाठी महापालिकेचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. या खर्चाच्या तुलनेत नाट्यगृहांच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न अतिशय किरकोळ स्वरूपाचे आहे. नाट्यगृह चालवणे हे ‘पांढरा हत्ती’ पोसण्याचा प्रकार असल्याचा अनुभव महापालिकेने वेळोवेळी घेतला आहे. आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च पालिकेने सोसला. तथापि, दिवसेंदिवस खर्चाचा आकडा वाढतच आहे. अपेक्षेइतके उत्पन्नही नाट्यगृहांमधून मिळत नसल्याने खासगी संस्थांना नाट्यगृह चालवण्यासाठी देण्याचा पर्याय पुढे आला. त्यानुसार, चिंचवडच्या थिएटर वर्कशॉप कंपनीला अत्रे रंगमंदिर चालवण्यासाठी देण्याचा निर्णय राजेश पाटील यांनी त्यांच्या प्रशासकीय अधिकारात नुकताच घेतला. सुरुवातीला सहा महिने प्रायोगिक तत्त्वावर सशर्त हे नाट्यगृह दिले जाणार आहे. १ ऑक्टोबरपासून संबंधित संस्थेला नाट्यगृहाचा ताबा दिला जाणार आहे. तोपर्यंत नाट्यगृहांमधील आवश्यक कामांची पूर्तता महापालिकेकडून केली जाणार आहे.
त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हे नाट्यगृह तोट्यातच –
सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ असावे म्हणून चिंचवडच्या मोरे नाट्यगृहापाठोपाठ अत्रे रंगमंदिराची उभारणी करण्यात आली होती. सुरुवातीपासूनच या ठिकाणी नाटकांचे प्रयोग अभावानेच झाले. सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्याही मोजकीच आहे. वाहनतळाची अडचण हे अत्रे नाट्यगृहाचे मोठे दुखणे आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी तथा आयोजकांना वाहने लावण्यासाठी पुरेशी जागा नाही. नाट्यगृहात उपाहारगृह उपलब्ध नाही. यासारख्या अनेक अडचणी जाणवत असल्यामुळे आतापर्यंत या नाट्यगृहाकडे पाठ फिरवण्यात येत होती. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हे नाट्यगृह तोट्यातच आहे. नाट्यगृहाचे उत्पन्न वाढावे तसेच चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा प्रेक्षक व आयोजकांना द्याव्यात, या हेतूने नाट्यगृह खासगी पद्धतीने चालवण्यासाठी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.