पिंपरी : आरोग्य विमा योजनेबाबत येणाऱ्या वारंवार तक्रारी विचारात घेता महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांसाठी धन्वंतरी गाेल्ड याेजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या याेजनेचा कार्यरत आणि निवृत्त अशा दहा हजार ४९३ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लाभ हाेणार आहे. वैद्यकीय उपचारासाठी एका कुटुंबासाठी वर्षाकरिता २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही याेजना दहा वर्षांसाठी लागू करण्यात आली असून, याची अंमलबजावणी १२ मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी असलेली धन्वंतरी स्वास्थ्य योजना बंद करून २०२४ मध्ये आरोग्य विमा योजना सुरू करण्यात आली हाेती. या योजनेबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढल्या हाेत्या. त्यामुळे चर्चेअंती पूर्वीच्या धन्वंतरी स्वास्थ्य याेजनेत सुधारणा करून धन्वंतरी गाेल्ड याेजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या याेजनेचा कार्यरत सहा हजार ७५९ कर्मचारी, त्यांची पत्नी वा पती आणि दाेन अपत्ये, तर निवृत्त झालेल्या तीन हजार ७३४ कर्मचारी आणि त्यांच्या पत्नी वा पतीला लाभ मिळणार आहे. कायमस्वरूपी अपंगत्व असलेल्या त्यांच्या अपत्यालाही लाभ मिळणार आहे.

‘अ’ आणि ‘ब’ संवर्गातील कर्मचाऱ्यांना प्रति महिना दीड हजार रुपये, ‘क’ संवर्गातील कर्मचाऱ्यांना एक हजार शंभर रुपये, तर चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ७०० रुपयांचा स्वहिस्सा द्यावा लागणार आहे. यामधून १२ काेटी १७ लाख ३१ हजार ६०० रुपये जमा हाेणार आहेत. उर्वरित रक्कम महापालिकेच्या फंडातून जमा केली जाणार आहे. या याेजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड, पुणे शहरातील ५० रुग्णालये व सिंगल स्पेशालिटीच्या दहा रुग्णालयांबराेबर करारनामा करण्यात आला आहे. तसेच आवश्यकता वाटल्यास या याेजनेत रुग्णालयांची संख्या वाढविण्यात येणार आहे. या याेजनेसाठी वर्षाकाठी ५० काेटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, उपचारावर २० लाखांपुढे खर्च झाल्यास वाढीव खर्चासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या १५ जणांची समिती निर्णय घेणार आहे.

‘आयव्हीएफ’साठी एक लाखाची मदत

महापालिकेतील ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अपत्य हाेत नाही, त्यांच्यासाठी पहिल्या अपत्यासाठी टेस्ट ट्यूब बेबी किंवा इन व्रिटाे गर्भधारणा (आयव्हीएफ) उपचार पद्धतीसाठी एक लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.

मद्यप्राशनावरील आजारांवर याेजना नाही

एखाद्या कर्मचाऱ्याला मद्यप्राशनामुळे आजाराची लागण झाली असल्यास, डाॅक्टरांनी मद्यप्राशनाचे कारण दिल्यास कर्मचाऱ्याला धन्वंतरी गाेल्ड याेजनेचा लाभ दिला जाणार नाही.

महापालिका कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली आराेग्य विमा याेजना ११ मार्च राेजी बंद हाेणार आहे. त्याऐवजी धन्वंतरी गाेल्ड याेजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी वर्षाकाठी ५० काेटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे आराेग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. लक्ष्मण गाेफणे यांनी सांगितले.