पिंपरी : औद्योगिक नगरीचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. शहरात उद्भवणाऱ्या आपत्तींवर नियंत्रण मिळविणे हे मोठे आव्हान आहे. शहराची झपाट्याने होणारी वाढ आणि औद्योगिक आस्थापनांची संख्या पाहता जपानमधील आपत्ती व्यवस्थापन पद्धतींमध्ये वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे विचाराधीन आहे. त्यामुळे शहराची आपत्ती व्यवस्थापन कार्यक्षमता अधिक सक्षम करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
महापालिका हद्दीत उद्भवणाऱ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींवर जलद तसेच प्रभावीपणे नियंत्रण कसे मिळवावे, याबाबत जपानमधील आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी कार्य करणाऱ्या स्थानिक प्राधिकरण परिषदेच्या सिंगापूर प्रतिनिधी कार्यालयाच्या वतीने महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित पाच दिवसीय अग्निशमन व आपत्ती प्रतिबंधक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी ही माहिती दिली. औंध कॅम्पच्या ३३० इन्फट्री ब्रिगेडचे कर्नल नितीन रुमाले, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे संतोष सिंह, सिंगापूर येथील जे क्लेर संस्थेचे कार्यकारी संचालक ताकानो, वरिष्ठ उपसंचालक नागता, उपसंचालक सुश्री कोबायाशी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उपआयुक्त मनोज लोणकर, राजेश आगळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा – मांजामुळे दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिक जखमी, छत्रपती शिवाजी पुलावरील घटना
‘जपानी तंत्रज्ञानाची आणि आपत्ती व्यवस्थापन हाताळणीची माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमातून होत आहे. जपानमधील आपत्ती व्यवस्थापन प्रणाली हे समन्वयाचे एक उत्तम उदाहरण आहे. पिंपरी-चिंचवड शहरात उद्भवणाऱ्या आपत्तीला सामोरे जात असताना आपत्ती व्यवस्थापन हे फक्त अग्निशमन विभागाकडील कार्य नसून, हे सर्व यंत्रणांनी समन्वयाने परिस्थिती हाताळण्याचे व्यवस्थापन आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये प्रत्येक यंत्रणेची एक महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. जपानमधील आधुनिक आपत्ती व्यवस्थापन प्रणालीमधील अत्याधुनिक संकल्पना, प्रतिसाद प्रणाली, प्रारंभिक चेतावणी प्रणाली, तंत्रज्ञानाचा वापर, सामाजिक सहभाग आदी गोष्टींचे अनुकरण केल्यास आपल्याकडे उद्भवणाऱ्या आपत्तींवर जलद तसेच प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यात मदत होईल. त्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.’ असे जांभळे यांनी स्पष्ट केले.
सर्वंकष आराखडा
शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या गृहप्रकल्पासह औद्योगिक आस्थापनांमुळे आपत्ती व्यवस्थापनासमोरील आव्हान वाढत आहे. आपत्ती येण्यापूर्वी, आपत्ती काळात आणि आपत्तीनंतर करण्यात येणारे व्यवस्थापन महत्त्वपूर्ण असते. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जपानी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार केला जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी सांगितले.
हेही वाचा – राज्यातील दुर्गम, आदिवासी भागातील जनतेला ‘टेलिमेडिसीन’ सेवेचा आधार!
आपत्तीप्रवण स्थळांची पाहणी
महापालिका क्षेत्रात चालणाऱ्या अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विषयक कामकाजाचे उप आयुक्त मनोज लोणकर, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जपान प्रशिक्षकांनी महापालिका क्षेत्रातील आपत्तीप्रवण स्थळांची पाहणी केली.
आपत्तीला पूर्ण तयारीनिशी सामोरे जाणे गरजेचे आहे. आपत्ती काळात शिस्त आणि वेळेला खूप महत्त्व असून, जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी प्राधान्य देणे अनिवार्य असते. कोणी, कुठे, कधी, काय करावे, हे निश्चित केल्यास आपत्तीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करता येते. आपत्तीला सामोरे जाऊन परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य आणि जागरूकता सामान्य नागरिकांमध्ये देखील निर्माण झाली पाहिजे, असे कर्नल नितीन रुमाले म्हणाले.