पिंपरी : इंद्रायणी नदीवरील बंधाऱ्याची पावसाळापूर्व आपत्ती व्यवस्थापनाची कामे हाती घेतल्याने पाण्याचा विर्सग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे मोशी, चऱ्होली, चोवीसावाडी, वडमुखवाडी, चिखली, डुडुळगाव, भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर या समाविष्ट भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शनिवारपर्यंत पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. निगडी प्राधिकरण व चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून शहरवासीयांना पाणीपुरवठा केला जातो. महापालिका प्रतिदिन पवना धरणातून ५२० दशलक्ष लिटर (एमएलडी), आंद्रातून ८० आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून १५ असे ६१५ दशलक्ष लिटर पाणी उचलते. आंद्रातील पाणी समाविष्ट गावांना दिले जाते. पुणे पाटबंधारे विभागांतर्गत असणाऱ्या खडकवासला कालवा उपविभाग क्रमांक दोन यांच्यामार्फत इंद्रायणी नदीवरील बंधाऱ्यांची पावसाळ्यापूर्वी करावयाची आपत्ती व्यवस्थापनाची कामे सुरू आहेत. त्यामुळे आंद्रा धरणातून इंद्रायणी नदीमध्ये करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे. परिणामी, मोशी, चऱ्होली, चोवीसावाडी, वडमुखवाडी, चिखली, डुडुळगाव, भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
हेही वाचा – पिंपरी : मेट्रोच्या निगडीपर्यंतच्या कामाला सुरुवात; कधीपर्यंत धावणार मेट्रो?
हेही वाचा – ‘हा’ विषय अधिक चिघळण्यापेक्षा मनोज जरांगे आणि सरकारने एकत्र बसाव : छत्रपती संभाजीराजे
१५ जूनपर्यंत अनियमित, विस्कळीत तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.