पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या मालमत्ताकरांची देयके वितरणास सुरुवात करण्यात आली आहे. बचत गटातील महिलांच्या माध्यमातून घरोघरी देयकांचे वितरण केले जात आहे. ३१ मे पर्यंत देयके वितरणाचे काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. तसेच ऑनलाइन माध्यमातून ३० जूनपर्यंत संपूर्ण कराचा आगाऊ भरणा केल्यास सामान्य करात दहा टक्के सवलत दिली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सहा लाख १५ हजार ८६३ नोंदणीकृत मालमत्ता आहेत. त्यानुसार सर्वच देयकांची छपाई होऊन वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. महिला बचत गटातील महिलांच्या माध्यमातून मिळकत कर देयके घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी महापालिकेने महिला आर्थिक विकास महामंडळावर सोपवली आहे. देयके वाटप करण्यात येणाऱ्या महिलांना महापालिकेच्या वतीने ओळखपत्र देण्यात आले आहे.

३१ मे पर्यंत सर्व देयकांचे वितरण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात कर संकलन विभागाला एक हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उदिष्ट साध्य करण्यासाठी विभागाने नियोजन सुरु केले आहे.

बचत गटांच्या महिलांमार्फत मालमत्ता कर देयकांचे वाटप सुरू झाले आहे. यामुळे बचत गटांच्या महिलांच्या आर्थिक सक्षमतेस बळकटी मिळणार आहे. नागरिकांपर्यंत वेळेवर देयके पोहोचवण्याच्या उद्देशालाही चालना मिळणार आहे. ३० जून २०२५ पर्यंत संपूर्ण कर भरल्यास मालमत्ताधारकांना विविध सवलतींचा लाभ घेता येणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले.

ऑनलाइन कर भरता येणार

महापालिकेच्या वतीने आर्थिक वर्ष २०२५-२६ ची मालमत्ता कर देयके ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आली आहेत. नागरिकांना ही देयके महापालिकेच्या http://www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर पाहता आणि भरता येतील. मालमत्ता कर देयक ३० जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने पूर्ण भरल्यास सामान्य करावर दहा टक्के सवलत मिळणार आहे. महिलांच्या नावावर असलेल्या निवासी मालमत्तेवर सामान्य करात ३० टक्के, अपंगांना ५० टक्के व माजी सैनिकांना मालमत्ता करात शंभर टक्के या सवलती कायम ठेवण्यात आल्या आहेत.

अशी आहे मालमत्ता कर सवलत योजना

  • ३० जून २०२५ पर्यंत आगाऊ तसेच ऑनलाईन मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी १० टक्के
    सवलत
  • फक्त महिलांच्या नावावर असलेल्या निवासी मालमत्तेस ३० टक्के कर सवलत
  • ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणाऱ्या अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधिर व
    मूकबधिर यांच्या नावावर असणाऱ्या मालमत्तेस ५० टक्के सवलत
  • ग्रीन बिल्डिंग रेटिंगमध्ये ३ ते ५ रेटिंग असणाऱ्या मालमत्तांना ५ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत
    सवलत
  • कंपोस्टींग यंत्रणा, एसटीपी प्लांट, झिरो वेस्ट संकल्पना राबविणाऱ्या निवासी मालमत्तांना
    सामान्य करात ५ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत सवलत
  • शैक्षणिक इमारतींमध्ये ऑनसाईट कंपोस्टिंग, झिरो वेस्ट, झिरो वेस्ट रेनवॉटर हार्वेस्टिंग, झिरो वेस्ट सौर ऊर्जा यासंकल्पना राबवणाऱ्या मालमत्तांना सामान्य करात ४ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत सवलत
  • शौर्य पदक धारक व माजी सैनिक, विधवा पत्नी, अविवाहित शहीद, सैनिक यांना मालमत्ताकरात १०० टक्के सवलत
  • सलग तीन वर्षे मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांना सामान्य कर रकमेवर २ टक्के सवलत