पिंपरी पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही शिक्षण मंडळाच्या अंदाजपत्रकाला कात्री लावली आहे. पालिकेच्या आर्थिक परिस्थितीचे कारण देत ‘ई लर्निग’ ला तरतूद देण्यास असमर्थता व्यक्त करतानाच जवळपास सात कोटी रूपयांची कपात सुचवली आहे. आयुक्तांचे हे धोरण मंडळाच्या सदस्यांना अमान्य असून, आम्ही सादर केलेले अंदाजपत्रकच मंजूर करावे, असे साकडे मंडळाने स्थायी समितीला घातले आहे.
पिंपरी पालिकेची श्रीमंती जोपासणारी जकात रद्द झाली आणि एक एप्रिलपासून एलबीटी (स्थानिक संस्था कर) लागू करण्यात आली. त्यातून पहिल्या वर्षी अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे लक्षात आल्याने आयुक्तांनी कपातीचे धोरण अवलंबले आहे. पिंपरी शिक्षण मंडळाचे २०१३-१४ चे १०८ कोटी १३ लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी आहे. त्यात आयुक्तांनी सात कोटींची कपात सुचवली आहे. त्यामुळे मंडळाच्या सदस्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. पुणे महापालिकेप्रमाणे पिंपरीतही ‘इ लर्निग स्कूल’ सुरू करण्याचा सदस्यांचा आग्रह आहे. त्यासाठी मंडळाने अडीच कोटींची तरतूद केली होती. मात्र, आयुक्तांनी त्यास कात्री लावली आहे. याशिवाय, अन्य खर्चातही आयुक्तांनी सुचवलेली कपात सदस्यांना मान्य नाही. शिक्षण मंडळाने मंजूर केलेले अंदाजपत्रकच स्थायी समितीने मंजूर करावे, असे साकडे मंडळाचे सभापती फजल शेख यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांना घातले आहे. याबाबत बुधवारी होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.