शिक्षण मंडळात एकही अधिकारी टिकत नसल्याने पिंपरी पालिकेच्या शैक्षणिक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून सगळा कारभार विस्कळीत झाला आहे. तथापि, त्याचे कोणालाही सोयरसुतक नसल्याचे दिसते. बारा महिन्यांत तब्बल सात प्रशासन अधिकारी झाल्याने मंडळाचा कारभार सुस्तावला आहे. दुसरीकडे, सभापती विजय लोखंडे यांच्या मनमानीला सदस्य वैतागले आहेत. मात्र, महापौरांप्रमाणेच मुदतवाढ मिळवण्याच्या लोखंडे यांच्या हालचाली सुरू आहेत.
शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी म्हणून सुधाकर तांबे यांनी तब्बल सहा वर्षे राज्य केले. बदलीनंतरच त्यांचे ‘राज्य’ खालसा झाले. त्यानंतर एकही अधिकारी फारसा टिकाव धरू शकला नाही. हरी भारती यांनी काही काळ होते. नंतर, विष्णू जाधवांकडे दोन वेगवेगळ्या कालावधीत प्रभारी कार्यभार होता. तेव्हा माध्यमिक व प्राथमिक असे दोन्ही विभाग त्यांच्याकडे होते. शासनाकडून बाळासाहेब ओव्हाळ यांची प्रतिनियुक्तीवर वर्णी लागली. तेव्हा विष्णू जाधव आणि ओव्हाळ यांच्यातील शह-काटशहाने सर्वानाच त्रास झाला होता. सहायक आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे काही दिवस जबाबदारी होती. पुढे, बी. के. दहिफळे यांच्याकडे अतिरक्ति कार्यभार होता. नंतर, डॉ. अशोक भोसले मंडळात आले. मात्र, त्यांचा जम बसू शकला नाही. भोसलेंच्या बदलीनंतर पुण्यातील सत्यवान सोनवणे यांच्याकडे प्रभारी कार्यभार देण्यात आला. आता आशा उबाळे यांची निवड झाली आहे. त्या किती दिवस तग धरतात, याविषयी मंडळात साशंकता व्यक्त केली जाते.
दुसरीकडे, मुदत संपली तरी सभापती खुर्ची सोडण्याची चिन्हे नाहीत. त्यांना मुदतवाढ हवी असून आगामी शिक्षक दिनही सभापती म्हणून साजरा करायचा आहे. अजितदादांच्या नावाखाली ते कोणतेही उद्योग करतात, असा अन्य सदस्यांचा आक्षेप आहे. त्यांच्या कार्यपध्दतीला कंटाळलेल्या अन्य सदस्यांचा नवीन सभापती हवा आहे.
सभापतिपदासाठी फजल शेख, चेतन घुले, चेतन भुजबळ, निवृत्ती शिंदे, धनंजय भालेकर, नाना शिवले तीव्र इच्छुक आहेत. शिरीष जाधव यांना उपसभापतीपद हवे आहे. स्थानिक नेत्यांनी सर्वानाच गाजर दाखवून ठेवले आहे. मात्र, अंतिम निर्णय अजितदादाच घेणार आहेत.
पिंपरी शिक्षण मंडळात वर्षभरात सात प्रशासन अधिकारी
बारा महिन्यांत तब्बल सात प्रशासन अधिकारी झाल्याने शिक्षण मंडळाचा कारभार सुस्तावला आहे. दुसरीकडे, सभापती विजय लोखंडे यांच्या मनमानीला सदस्य वैतागले आहेत. मात्र, महापौरांप्रमाणेच मुदतवाढ मिळवण्याच्या लोखंडे यांच्या हालचाली सुरू आहेत.
First published on: 15-08-2013 at 02:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri education board chairman wants terms as a mayor