नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, नगरसेवकांवर प्रश्नांचा भडिमार, वाढत्या गोंधळामुळे झालेली सूत्रसंचालकाची त्रेधा आणि आवरता घेतलेला कार्यक्रम असे चित्र निगडी प्राधिकरणातील इच्छुक उमेदवारांच्या ‘आमने-सामने’ कार्यक्रमात बघायला मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राधिकरण-आकुर्डी गावठाणातील (प्रभाग क्रमांक १५) इच्छुकांचा ‘निवडणूक २०१७ दशा आणि दिशा’ असा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात आर. एस. कुमार, योगेश बहल, राजू मिसाळ, नीलेश पांढारकर, एकनाथ पवार, सुलभा उबाळे, श्यामला सोनवणे असे विविध पक्षाचे नेते हजर होते. याशिवाय, विजय सिनकर, अप्पा डेरे, अरुण थोरात, अमित गावडे, प्रा. सचिन काळभोर, बाळा शिंदे, नीलेश िशदे, राधिका बोर्लीकर, शैलजा मोरे, मनीषा निकम, कोमल काळभोर, वैभवी घोडके आदी इच्छुक उमेदवारांनी आवर्जून सहभाग घेतला होता. सूत्रसंचालन डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्याकडे होते.

कार्यक्रमाला सुरुवात होताच परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. नगरसेवक विरुद्ध अन्य इच्छुक असे चित्र दिसत होते. प्राधिकरणाची आकुर्डी करणार का, हा मुद्दा या कार्यक्रमात वादग्रस्त ठरला. ज्येष्ठ नगरसेवकाकडून विरोधकाला उद्देशून सुटलेली शिवी हाही चर्चेचा विषय झाला. अनेक मुद्यांचे झालेले राजकारण, नगरसेवकांनी उत्तर देण्यासाठी घेतलेले आढेवेढे, महिला नगरसेविकांची दांडी, नगरसेवकांना जाब विचारणारे नागरिक असे चित्र कार्यक्रमात होते. कार्यक्रमात आरोप-प्रत्योराप होत राहिले आणि तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात आर. एस. कुमार सर्वाचे ‘लक्ष्य’ ठरले. राष्ट्रवादीने पालिका कंगाल केल्याचा आरोप करत विकासकामांच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपाने केला. तेव्हा राष्ट्रवादीने भ्रष्टाचार केल्याचा कांगावा केला जातो. मात्र, राष्ट्रवादीतून भाजपत आलेले कोण आहेत, याचा विचार करावा, असा पलटवार राष्ट्रवादीने केला. भाजपने नवीन लोकांना संधी देऊन निवडून आणून दाखवावे, असे आव्हानही राष्ट्रवादीने दिले. सत्तेत असून अडचण व नसून खोळंबा असल्याची टिप्पणी सेना नेत्यानेच केली.’

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri election