मुलींसाठी केंद्र सरकारकडून ‘बेटी बचाव’ मोहीम राबवली जात असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये या प्रयत्नांना छेद देणारी घटना घडली आहे. आई- वडिलांना पोटची मुलगीच भार वाटू लागली आहे. आकुर्डीत राहणाऱ्या भोसले दाम्पत्याने मुलीचे पालनपोषण करण्यास नकार दिला असून पोलिसांनी या दाम्पत्याविरोधात आता गुन्हा दाखल केला आहे.

आकुर्डीत राहणाऱ्या राजेश भोसले (३९) आणि प्रतिभा (३४) या दाम्पत्याला १० वर्षांची मुलगी समृद्धी आणि अडीच वर्षांचा मुलगा शौर्य अशी दोन मुलं आहेत. ११ वर्षांपूर्वीच या दाम्पत्याचे लग्न झाले होते. भोसले दाम्पत्यामध्ये सध्या वाद सुरु असून हा वाद निगडी पोलीस ठाण्यात पोहोचला. राजेश आणि प्रतिभा या दोघांनीही मुलगा शौर्यचा सांभाळ करण्यास होकार दिला. पण समृद्धीला घरी नेण्यास दोघांनीही नकार दिला. शेवटी पोलिसांनी समजूत काढल्यानंतर राजेश दोन्ही मुलांना घेऊन घरी गेला. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्याने दोन्ही मुलांना पुन्हा पोलीस ठाण्यात आणून सोडले. राजेशने मुलांचा सांभाळ करण्यासाठी पैसे द्यावेत, असे प्रतिभाचे म्हणणे आहे. त्यामुळेच ती मुलांना नेत नसावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आई- वडिलांच्या वादात दोन्ही मुलांचे हाल झाले आहेत. सध्या दोन्ही मुलं पोलिसांकडेच असून निगडी पोलीसच त्यांचा सांभाळ करत आहे.

Story img Loader