पिंपरी : औद्योगिक, कामगार, कष्टकऱ्यांची नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात सांस्कृतिक चळवळ रुजू लागली आहे. चिंचवड येथे झालेल्या नाट्यगृहात चित्रपट महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन दिवस प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली होती. महोत्सवात विद्यार्थी, तरुण, महिला, ज्येष्ठ अशा सात हजार २०० रसिकांनी चित्रपटाचा आनंद लुटला. हा प्रतिसाद पाहता आता महापालिकेच्या नाट्यगृहात महिन्यातून दोन वेळा चित्रपट महोत्सव भरविण्यात येणार आहे.

‘मराठी चित्रपट संवर्धन आणि प्रदर्शनास चालना’ या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड महापालिका आणि मराठी चित्रपट असोसिएशन यांच्यातर्फे ‘नाट्यगृहात चित्रपट’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. दि. २४ आणि २५ मार्च रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. केवळ ५० रुपयांत दर्जेदार चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध झाल्याने प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. महोत्सवाच्या दोन्ही दिवशी सात हजार २०० नागरिकांनी मराठी चित्रपटांचा आनंद लुटला. लोणावळ्याहूनही प्रेक्षक आले होते.

मराठी चित्रपटांना ‘मल्टिप्लेक्स’मध्ये जागा मिळत नसल्यामुळे ते प्रदर्शित होत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी खास नाट्यगृह उपलब्ध करून देण्याचा पहिला प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर येथे यशस्वी झाला. त्यामुळे पिंपरी महापालिकेनेही चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चित्रपटासाठी उपलब्ध करून दिले. प्रेक्षागृहांमध्ये मराठी चित्रपट दाखविण्याचा या कल्पनेला पिंपरी-चिंचवडकरांनीही उदंड प्रतिसाद दिला. महोत्सवामध्ये ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’, ‘इलू इलू’, ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’, ‘चिकी चिकी बुबूमबूम’, ‘श्यामची आई’, ‘संगीत मानापमान’, ‘ हॅशटॅग तदैव लग्नम्’ हे चित्रपट दाखवले गेले. त्यांपैकी ‘चिकी चिकी बुबूमबूम’, ‘श्यामची आई’, ‘संगीत मानापमान’ आणि ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ हे शो हाऊसफुल्ल झाले. ‘श्यामची आई’ हा चित्रपट दोन्ही दिवस दाखवण्याची मागणी प्रेक्षकांनी केली.

महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने महिन्यातून दोन वेळा नाट्यगृहात चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. या अंतर्गत नवीन मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. त्यासाठी महिन्यातील दोन दिवस नाट्यगृह राखीव ठेवण्यात येणार आहे. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, आचार्य अत्रे रंगमंदिर, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, नटसम्राट निळू फुले नाट्यगृह आणि ग. दि. माडगूळकर या महापालिकेच्या नाट्यगृहात चित्रपट महोत्सव होणार आहे.

मराठी चित्रपट महोत्सवात मी पाच चित्रपट पाहिले. मराठी चित्रपट मराठी प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचे हक्काचे स्थान नाट्यगृह आहेत. नाट्यगृहात चित्रपट या संकल्पनेमुळे मराठी चित्रपट हा मराठी प्रेक्षकांपर्यंत सहजरीत्या पोचतोय, तोदेखील ५० रुपये एवढ्या माफक दरात. या संकल्पनेला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे, असे प्रेक्षक पद्मेश कुलकर्णी म्हणाल्या.

मराठी चित्रपट पाहण्याच्या ओढीमुळे कार्यालयात जायचे असूनदेखील सकाळी साडेआठचा चित्रपट पाहण्यासाठी नाट्यगृहात आले. मध्यांतरात ‘लॉगिन’ करून चित्रपट संपवून कामावर रुजू झाले. चित्रपटाचा आनंद वेळेनुसार आणि कमी पैशांत घेता आल्याचे आर्या देशपांडे यांनी सांगितले.

मराठी चित्रपटांना मोठा प्रेक्षकवर्ग आहे. अशा महोत्सवांमुळे मराठी भाषा संवर्धन करण्यास मोठी मदत मिळणार आहे. या महोत्सवासाठी महिन्यातून दोन वेळा नाट्यगृह राखीव ठेवण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले. तर, या महोत्सवाला सात हजार २०० प्रेक्षकांनी भेट दिली. तिकीट दर माफक असल्याने प्रेक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. प्रेक्षकांना मराठी चित्रपट पाहायचा आहे, पण माफक दरात. त्यांच्या खिशाला परवडेल असा दर असावा. दर महिन्याला हा महोत्सव होणार आहे, असे मराठी चित्रपट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.