पिंपरी : शहर पोलीस दलातील शिपाई पदाच्या २६२ जागांसाठी १५०४२ अर्ज आले आहेत. त्यात तृतीयपंथी उमेदवारांचाही समावेश आहे. बुधवारपासून (१९ जून) भोसरी, इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅक (कृत्रिम धावमार्ग) मैदानावर भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात शिपाई पदाच्या २६२ जागांची भरती केली जात आहे. सर्वसाधारण उमेदवारांसाठी ७९, महिला ७८, खेळाडू १५, प्रकल्पग्रस्त १४, भूकंपग्रस्त चार, माजी सैनिक ४१, अंशकालीन पदवीधर ११, पोलीस पाल्य सात, गृहरक्षक दल १३ अशा जागा आहेत. भरतीप्रक्रियेत प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यामध्ये किमान ५० टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून १:१० प्रमाणात उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांनी लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. ४० टक्क्यांहून कमी गुण मिळवणारे उमेदवार अपात्र समजले जातील. मैदानी चाचणीसाठी पहिल्या दिवशी ५००, त्यानंतर दररोज १२०० उमेदवार आणि ५ जुलै रोजी १६२० उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडकरांना २०२६ पर्यंत दिवसाआडच पाणीपुरवठा? ‘या’ प्रकल्पाची रखडपट्टीच
शारीरिक आणि लेखी चाचणीमधील गुणांच्या आधारे उमेदवारांची एक गुणवत्तायादी तयार केली जाणार आहे. त्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी केली जातील. कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार केली जाईल. त्यानंतर अंतिम गुणवत्तायादी तयार केली जाणार आहे. भरतीप्रक्रियेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी ३९६ पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पावसामुळे एखाद्या दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही, तर उमेदवारांना पुढील तारीख दिली जाईल. काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरिता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणीकरिता हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल, तर अशा उमेदवारांना दुसरी तारीख देण्यात येईल. उमेदवारांना अडचणी असल्यास त्यांचे निरसन स्थानिक पातळीवर केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
पालखी सोहळ्यानिमित्त भरती प्रक्रियेस खंड
दि. १९ जून ते १० जुलै या कालावधीत भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र, देहू-आळंदी येथील पालखी सोहळा २८ ते ३० जून या कालावधीत शहरात असल्याने भरती प्रक्रिया खंडित राहणार आहे.
हेही वाचा – ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अश्वांचे अंकलीहून प्रस्थान
भरती दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेतली आहे. पर्यायी (डमी) उमेदवार उपस्थित राहू नये, यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब केला जाणार असल्याचे प्रभारी पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी सांगितले.