पिंपरी : एकतर्फी प्रेमातून आणि लग्नास नकार दिल्याने चाकूने गळ्यावर व पोटावर वार करुन तरुणीचा खून केल्याची घटना म्हाळुंगे एमआयडीसीतील आंबेठाण येथे घडली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने आरोपीला पाठलाग करुन सातारा-कराड रोड येथून अटक केली.

प्राची विजय माने (वय २१, रा. आंबेठाण, खेड, मूळ- इस्लामपूर, वाळवा) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. अविराज रामचंद्र खरात (रा. बहे. ता. वाळवा) याला अटक केली आहे. आंबेठाण येथे मुलीच्या गळ्यावर चाकूने वार करुन खून झाल्याची माहिती रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एकतर्फी प्रेमातून आणि लग्नास नकार दिल्याने अविराज याने गळ्यावर व पोटावर चाकूने वार करुन प्राचीचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी प्राचीचा मोबाइल फोनदेखील सोबत घेऊन तो पसार झाला होता.

हेही वाचा – अपघाती मृत्यू झालेल्या महापालिका कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना ‘इतक्या’ लाखांची मिळणार नुकसान भरपाई…

हेही वाचा – पीएमपी कर्मचाऱ्यांचा संप; प्रवाशांचे हाल

अविराज हा दुचाकीवरुन सातारा ते कराड रोडवरुन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून अविराज याचा १५ किलोमीटर पाठलाग केला. पोलिसांना पाहताच अविराज पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन मोबाइल संच, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.