पिंपरी : चिखली, कुदळवाडीतील ८५० एकरवर असलेल्या अनधिकृत गाेदामे, पत्राशेड, भंगार दुकानांसह लघु उद्याेगांवर सुरू असलेल्या पाडापाडीच्या कारवाईचा खर्च संबंधित जागा मालकांकडून वसूल करण्यात येणार आहे. त्यांच्या सातबारा उताऱ्यावर या खर्चाचा बाेजा चढविण्यात येणार आहे. या पाड कामाच्या कारवाईसाठी अंदाजे एक काेटींचा खर्च येण्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
अतिक्रमणावर मागील सहा दिवसांपासून सरसकट कारवाई सुरू असून रविवारपर्यंत सुरूच राहणार आहे. आतापर्यंत ४७३ एकर क्षेत्रफळावरील दोन हजार ८४५ अनधिकृत बांधकामे जमीनदाेस्त करण्यात आली आहेत. या कारवाईसाठी ४६ पाेकलेन, आठ जेसीबी, एक क्रेन, चार कटर या यंत्रसामग्रीसह पाेलीस, इतर मनुष्यबळ, जेवण, साहित्य यावर अंदाजे एक काेटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. हा खर्च जागा मालकांकडून वसूल करण्यात येणार आहे. अनधिकृत भंगार गोदामे, पत्राशेड यामुळे या परिसराला बकालपणा आला हाेता. सातत्याने आगीच्या घटना घडत हाेत्या. यातून माेठ्या प्रमाणात वायुप्रदूषण हाेत हाेते.
महापालिकेने अनधिकृत व्यावसायिकांचे सर्वेक्षण केले. यामध्ये अनेक व्यावसायिकांनी अग्निशमन दाखला, उद्याेग धंदा परवाना, प्रदूषण नियंत्रण महामंडळाची काेणतीही परवानगी घेतली नसल्याचे समाेर आले. त्यानंतर कारवाईची मोहीम हाती घेतली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे म्हणाले, ‘शहराची लाेकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मूलभूत सुविधा पुरविताना ताण येत आहे. वाकड भागातील दत्त मंदिर परिसरातही अतिक्रमणाची माेठी कारवाई करण्यात आली. कुदळवाडीतील कारवाईसाठी काेणताही राजकीय दबाव नाही. सरसकट कारवाई केली जात आहे. उद्याेजकांच्या काेणत्याही यंत्रसामग्रीला इजा पाेहोचू दिली नाही. साहित्य काढण्यासाठी व्यावसायिकांना पुरेसा वेळ देण्यात आला हाेता.
पुन्हा अतिक्रमण झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई
कुदळवाडी परिसरात पुन्हा अतिक्रमण हाेऊ नये, यासाठी बीट निरीक्षक, क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे पथक नेमले जाणार आहे. हे पथक परिसरात गस्त घालणार आहे. त्यामुळे अतिक्रमण हाेणार नाही. त्यानंतरही अतिक्रमण झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
साहित्य न उचलल्यास जागा मालकांना नाेटीस
पाडकामाची कार्यवाही केल्यानंतर जागा मालकांनी पत्राशेडसह त्यांचे सर्व साहित्य दुसरीकडे उचलून घेऊन जावे. साहित्य जागेवर ठेवल्यास आगीची घटना घडू शकते. साहित्य न हटविल्यास जागा मालकांना नाेटीस देण्यात येणार आहे.
बाेजा चढविण्याची प्रक्रिया
अतिक्रमण कारवाईच्या खर्चाची जागेच्या क्षेत्रफळानुसार विभागणी केली जाणार आहे. खर्च, जागेचा सर्व्हे नंबर, मालमत्ता क्रमांकासह महापालिका तहसीलदार किंवा तलाठ्यांना पत्र देणार आहे. त्यानंतर संबंधित जागा मालकांच्या सातबारा उताऱ्यावर बाेजा चढविण्यात येणार आहे. भविष्यात जागा मालकांना काेणताही व्यवहार करण्यापूर्वी हे पैसे महापालिकेकडे जमा केल्याशिवाय व्यवहार करता येणार नाही.
पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांच्या निळ्या पूररेषेतील बांधकामेही पाडण्यात येणार आहेत. तळवडे, काळेवाडी, थेरगाव, पिंपरी, वाल्हेकरवाडीतही कारवाई केली जाणार आहे. भंगार दुकाने शहराबाहेर काढण्यात येणार आहेत, असे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.