पिंपरी : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार वेगाने काम करत नसल्याचा आरोप करत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मुदतीत सोडवावा यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या आवाहनानुसार पिंपरी-चिंचवड मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तिसऱ्या टप्प्यातील उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात गुरुवारपासून बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. वैभव जाधव, मीरा कदम, लहू लांडगे, संपत पाचुंदकर, सतीश काळे यांनी उपोषण केले. मारुती भापकर, कामगार नेते काशिनाथ नखाते, धनाजी येळकर पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
हेही वाचा : बालेकिल्ल्यात शरद पवार आणि अजितदादा पुन्हा एकाच व्यासपीठावर? ‘हे’ निमित्त…!
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज महाराष्ट्रभर विविध प्रकारचे आंदोलन करत आहे. मराठा समाजास कुणबी नोंदी तपासून कुणबी दाखले देणे, मराठा समाजास कुणबी दाखले देऊन सरसकट ओबीसी प्रवर्गातून ५० टक्क्याच्या आत आरक्षण देणे यासाठी महाराष्ट्र सरकारने २४ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदत घेतली आहे. परंतु, महाराष्ट्र भर सरकार याबाबत जलद गतीने काम करताना दिसत नाही. सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी, मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मुदतीत सोडवावा यासाठी साखळी उपोषण सुरू केले आहे. प्रत्येक समाजास न्याय मिळावा, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे यासाठी जातीनिहाय जनगणना करावी. वेळ पडल्यास केंद्र सरकारकडे पाठपुरवठा करून महाराष्ट्र सरकारने घटना दुरुस्ती करून मराठा समाजास न्याय द्यावा असे मारुती भापकर म्हणाले.