पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे पुन्हा परदेश दौऱ्यावर जात असून तीन नगरसेविका व एका अधिकाऱ्यासह आठवडय़ासाठी त्या दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. अभ्यास दौरा आणि कार्यशाळेच्या गोंडस नावाने होणाऱ्या दौऱ्यांमध्ये अभ्यास होतो की मौजमजा, याविषयी उलट-सुलट चर्चा आहे.
दक्षिण कोरियातील गुनसान शहराबरोबर पिंपरी महापालिकेचा मैत्री करार आहे. तेथील लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने शहराचा दौरा केला व शहरातील प्रकल्पांची पाहणी केली होती. तेव्हा गुनसान शहराला भेट देण्याचे निमंत्रणही महापौरांना दिले होते. त्यानुसार, येथील कार्यशाळेसाठी महापौरांना विमानाचे तिकीट पाठवले असल्याचे सांगण्यात आले. महापौरांसमवेत काँग्रेस नगरसेविका आरती चोंधे, राष्ट्रवादीच्या नगसेविका मंदाकिनी ठाकरे, अपक्ष नगरसेविका भारती फरांदे आणि जनसंपर्क विभागातील प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे आहेत. हे चौघे सोमवारी पहाटे दक्षिण कोरियाला रवाना होत आहेत. पालिका पदाधिकारी व अधिकारी सातत्याने वेगवेगळ्या कारणास्तव परदेश दौऱ्यांवर जात आहेत. अशा कथित दौऱ्यांवरून नेहमी टीका होत असली तरी दौऱ्यांचा अट्टाहास कायम दिसून येत आहे. दौऱ्यांसाठी पालिकेच्या तिजोरीतून खर्च होत नाही, आम्ही स्वखर्चाने जात असल्याचा युक्तिवाद संबंधितांकडून वेळोवेळी करण्यात येत असला तरी त्यात कितपत तथ्य आहे, हा संशोधनाचा विषय मानला जातो.

Story img Loader